ठाण्यात मिंध्यांचे ‘कुणी उमेदवार देता का उमेदवार’! भाजपने दावा ठोकल्याने झाली गोची

संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच सर्वांचे लक्ष लागले आहे ते ठाणे लोकसभा मतदारसंघाकडे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र ज्या मातोश्रीच्या पाठीत खंजीर खुपसून एकनाथ शिंदे यांनी भाजपशी मिंधेगिरी करीत शिवसेना पह्डली, त्याच ठाण्यात मिंध्यांना लोकसभेसाठी अजून उमेदवारच सापडलेला नाही. भाजपच्या पदाधिकाऱयांनी ठाणे लोकसभा मतदारसंघावरही दावा ठोकत कोणत्याही परिस्थितीत आम्ही मिंध्यांच्या उमेदवाराचे काम करणार नाही, असा उघड पवित्रा घेतल्याने मिंधेंच्या तंबूत प्रचंड चलबिचल झाली आहे. ‘कुणी उमेदवार देता का उमेदवार’ असे म्हणण्याची वेळ मिंधे गटावर आली आहे.

ठाणे लोकसभेचे 2014 पासून शिवसेनेचे राजन विचारे हे प्रतिनिधित्व करीत आहेत. दोन्ही वेळेस ते दणदणीत मतांनी निवडून आले. विकासकामांच्या जोरावर निष्ठावंत राजन विचारे यांनी आपला दबदबा या मतदारसंघात निर्माण केला. एकनाथ शिंदे यांनी दगाफटका केल्यानंतरही ठाण्यात शिवसेनेचाच बोलबाला कायम राहिला आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांचा दावा
भाजप व मिंधे यांनी एकत्र येऊन राज्याची सत्ता मिळवली असली तरी ठाणे लोकसभेचा विचार केला तर येथे त्यांच्यातून विस्तवही जात नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात आम्ही मिंध्यांचा प्रचार करणार नाही, अशी जाहीर भूमिका भाजपच्या पदाधिकाऱयांनी घेतली होती. त्याच धर्तीवर ठाण्यातही आमदार संजय केळकर व माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी ठाणे लोकसभेची जागाही आमचीच असल्याचा दावा केला आहे.

गद्दार विरुद्ध निष्ठावान
ठाणे लोकसभेसाठी मिंधे गटाचे रवींद्र फाटक, आमदार प्रताप सरनाईक, नरेश म्हस्के यांची नावे चर्चेत आहेत. पण मिंध्यांच्या विरोधात सर्वसामान्य मतदारांमध्ये प्रचंड खदखद असून गद्दारांना धडा शिकवण्याची संधी ठाणेकर शोधत आहेत. ठाणे लोकसभेची निवडणूक ही गद्दार विरुद्ध निष्ठावान अशीच होणार हे माहीत असल्याने आपला सुपडा साफ होण्याच्या भीतीने ते बॅकफूटवर गेले आहेत. मिंध्यांबरोबर कॉण्ट्रक्टर आणि ठेकेदार गेले. पण सर्वसामान्य निष्ठावान शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम उभे आहेत.