अपघाताचा एफआयआर नसतानाही हयगयीबद्दल जबाबदार धरता येते! उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

पोलिसांनी अपघाताचा एफआयआर नोंदवला नाही तरी अपघातास कारणीभूत वाहनचालकाला हयगयीबद्दल जबाबदार धरता येऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. अपघातात जखमी झालेल्या मुलुंड येथील तरुणाला भरपाईसाठी पात्र ठरवत मोटार अपघात दावे लवादाने निर्णय दिला होता. त्या निर्णयाविरोधातील विमा कंपनीचे अपील न्यायालयाने फेटाळले आहे.

न्यू इंडिया अॅशुरन्स पंपनीने मोटार अपघात दावे लवादाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पंपनीच्या अपिलावर न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्यापुढे सुनावणी झाली. घडलेल्या अपघातप्रकरणी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला नाही. अशा स्थितीत हयगयीबद्दल जबाबदारी निश्चित करणे चुकीचे असल्याचा दावा विमा पंपनीने केला. त्यावर अपघातात जखमी झालेल्या 34 वर्षीय लालबहादूर गुप्तातर्फे अॅड. सुषमा पोयरेकर यांनी आक्षेप घेतला. रस्त्याने चालत असताना कारने धडक दिली. या अपघाताबद्दल पोलिसांत तक्रार नोंदवली, मात्र पोलिसांनी एफआयआर न नोंदवता केवळ स्टेशन डायरीमध्ये घटनेची नोंद केली. अपघात किरकोळ स्वरूपाचा असल्याचे कारण पोलिसांनी दिले, याकडे अॅड. पोयरेकर यांनी लक्ष वेधले. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने विमा पंपनीचा दावा फेटाळला. पोलिसांनी एफआयआर नोंदवला नसला तरी हयगयीबद्दल जबाबदारी निश्चित केली जाऊ शकते, असे नमूद करीत न्यायालयाने मोटार अपघात दावे लवादाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास स्पष्ट नकार दिला.

तक्रारीची दखल घेणे पोलिसांचे कर्तव्यच!
फौजदारी दंड संहितेच्या कलम 156 नुसार पोलिसांनी तक्रार प्राप्त झाल्यानंतर दखलपात्र गुह्यात एफआयआर नोंदवणे बंधनकारक आहे. तक्रारीची दखल घेणे पोलीसांचे कर्तव्यच आहे. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर त्याचा दोष दावेदाराला देऊ शकत नाही. या प्रकरणात अपघाताबद्दल दावेदाराने पोलिसांना कळवले होते तसेच घटना घडल्याची वस्तुस्थिती कारच्या चालकानेही मान्य केली आहे, असे निरीक्षण न्यायालयाने निकालपत्रात नोंदवले आहे.
 दावेदाराच्या म्हणण्यानुसार, 2 मे 2005 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तो रस्त्याशेजारून चालत होता. यावेळी भरधाव कारने त्याला जोरदार धडक दिली. त्यात तो रस्त्यावर फेकला गेला आणि जबडय़ाला जबर मार लागून पाच दात पडले. यावेळी कारचालकानेच उचलून रुग्णालयात दाखल केले होते, मात्र पोलिसांनी घटना किरकोळ स्वरूपाची असल्याचे कारण देत एफआयआर न नोंदवता केवळ स्टेशन डायरीत घटनेची नोंद केली.