अकरावीच्या रिक्त जागांचे करायचे काय? गेल्या वर्षी तब्बल 1 लाख 21 हजार 813 जागांवर प्रवेश नाहीत

मुंबई महानगर क्षेत्रात राबविण्यात येणाऱया अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत दरवर्षी रिक्त राहणाऱया जागांचे काय करायचे? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी ऑनलाइन प्रवेशासाठी 3 लाख 89 हजार 675 जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी 2 लाख 67 हजार 862 जागांवर म्हणजेच केवळ 69 टक्के प्रवेश झाले, तर उर्वरित 1 लाख 21 हजार 813 जागा रिक्त राहिल्या होत्या. दरवर्षी लाखोंनी जागा रिक्त राहत असताना यंदादेखील काही नवीन महाविद्यालये आणि तुकडय़ांनाही मान्यता देण्यात आल्याने रिक्त जागांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे.

मुंबई महानगर क्षेत्रातील अल्पसंख्याक आणि इतर सर्वच महाविद्यालयांमध्ये अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने केले जातात. यासाठी मुख्य आणि विशेष प्रवेश फेऱयांमधून प्रवेश दिले जातात. मुंबई परिसरात काही खासगी क्लासेस आणि ठरावीक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बेकायदेशीररीत्या काही वर्षांपासून इंटिग्रेटेड कॉलेज स्थापन करून प्रवेश केले जातात. त्यामुळेही इतर महाविद्यालयांमध्ये प्रवेशाच्या जागा मोठय़ा प्रमाणावर रिक्त राहत आहेत.

z अकरावीच्या व्यवस्थापन, इनहाऊस आणि अल्पसंख्याक असे तीन कोटय़ांतील प्रवेश होतात. मागील वर्षी मुंबईत असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 18 हजार 50 व्यवस्थापन कोटय़ासाठी जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी 10 हजार 92 जागांवर प्रवेश झाले होते, तर इनहाऊससाठी 25 हजार 554 इतक्या जागा होत्या. त्यापैकी 9 हजार 467 जागांवर प्रत्यक्ष प्रवेश झाले होते, तर अल्पसंख्याक कोटय़ासाठी सर्वाधिक 1 लाख 3 हजार 975 जागा होत्या. त्यापैकी केवळ 36 हजार 379 जागांवर
प्रवेश झाले.