उत्तुंग इमारतींची आग विझविण्यासाठी ‘एअर फोम सिस्टम’, अग्निशमन जवानांना बॅकपॅक मिळणार

प्रातिनिधिक फोटो

मुंबईतील उत्तुंग इमारतींना लागलेल्या आगी विझविण्यासाठी आता कॉम्प्रेस्ड एअर पह्म सिस्टमसह 65 वॉटर मिस्ट सिस्टम्सचा वापर केला जाणार आहे. यामध्ये पाच लिटरची पह्मची बॅग वजनाने हलकी असल्याने जवानांना पाठीवर घेऊन जाणे शक्य होणार आहे. यामुळे बचावकार्य करण्यासाठी घटनास्थळी जवानांना बॅकपॅक मिळणार असून जीवित-वित्तहानी टाळण्यास मदत होणार आहे.

मुंबईत झपाटय़ाने औद्योगिक आणि नागरी विकास होत असल्याने कुठल्याही ठिकाणी आगीसारखी दुर्घटना घडल्यास घटनास्थळी पोहोचणे अग्निशमन दलासाठी आव्हान ठरत आहे. शिवाय आगीवर पाणी मारून आग विझवण्याचेही आव्हानात्मक काम ठरते. या पार्श्वभूमीवर पालिका अग्निशमन दलात अत्याधुनिक सुविधा आणल्या जात आहेत. यामध्ये रोबोटही आणले जाणार आहेत. तर आता कॉम्प्रेस्ड एअर पह्म सिस्टमसह 65 वॉटर मिस्ट सिस्टम्सचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रासायनिक पदार्थाला लागलेली आग विझवण्यासाठी कॉम्प्रेस्ड एअर पह्मचा वापर केला जातो. कॉम्प्रेस्ड एअर पह्मचा वापर अन्य प्रकारच्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केला जातो. परंतु आता हाय राईज इमारतीत आगीच्या घटनास्थळी सहज पोहोचणे शक्य नाही, त्याठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पह्मचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

समुद्रकिनारी लाईफसेव्हिंग बॉयस
समुद्र किनारी चौपाटय़ांवर बुडणाऱया व्यक्तीला वाचवण्यासाठी सहा लाईफसेव्हिंग बॉयस खरेदी करण्यात येणार आहे. तसेच बॅटरी ऑपरेटेड स्मोक एक्जॉस्टर अँड ब्लोवर्स खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.