मुख्यमंत्र्यांनी घेतला दुष्काळाचा ‘पंचतारांकित’ आढावा

दुष्काळाच्या भयंकर वडवानलात मराठवाडा होरपळून निघतोय. हंडाभर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ लोकांवर आली आहे. माणसांबरोबर मुक्या जनावरांचेही चारापाण्याअभावी हाल होत आहेत. अशा भयावह परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी मराठवाडय़ातील दुष्काळाचा ‘पंचतारांकित’ आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीला पाच जिह्यांच्या पालकमंत्र्यांनी दांडी मारली. ‘चारापाणी मुबलक आहे, सगळे आबादीआबाद आहे’ असा दावा करून मुख्यमंत्र्यांचे विमान उडाले!

मराठवाडय़ाच्या आठही जिह्यांवर गेल्या वर्षी पावसाने अवकृपा केली. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने खरिपाचे वाटोळे झाले. त्यानंतर अवकाळी, गारपिटीने मराठवाडय़ात थैमान घातले. अस्मानी संकटाने उरल्यासुरल्या खरिपाचा चिखल केला, तर येणाऱया रब्बी हंगामालाही संकटात टाकले. दोन्ही हंगाम हातचे गेल्याने शेतकरी वाऱयावर आला. अतिवृष्टी, गारपिटीचे पंचनामे करून मदत देण्याचा सरकारी शब्दही हवेतच विरला. पाऊसच कमी झाल्याने धरणे, तलावातही साठा जेमतेम झाला. हे पाणी जानेवारीपर्यंत कसेबसे पुरले. फेब्रुवारीपासूनच मराठवाडय़ाच्या अनेक भागात टँकर सुरू करण्याची वेळ आली. पाऊसच नसल्यामुळे चाऱयाची चणचणही निर्माण झाली. चारापाणी नसल्यामुळे उमदी जनावरे कसायाच्या पिंवा बाजाराच्या वाटेला लागली. मार्चमध्ये लोकसभेची आचारसंहिता लागली. मार्च, एप्रिल आणि आता संपत आलेला मे महिना असे तीन महिने राज्य सरकारला मराठवाडय़ाकडे बघण्याची उसंतच मिळाली नाही.

मुख्यमंत्री आले, आढावा घेतला आणि निघून गेले

महाराष्ट्रातील मतदान संपताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मराठवाडय़ात आले. दुपारी 2 वाजता त्यांचे छत्रपती संभाजीनगरात आगमन झाले. मुख्यमंत्र्यांचा काफिला विभागीय आयुक्त कार्यालयात गेला. अवघ्या दोन तासांत म्हणजेच 120 मिनिटांत मुख्यमंत्र्यांनी मराठवाडय़ाच्या छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, लातूर तसेच धाराशीव या जिह्यांतील दुष्काळी फायलींवर नजर टाकून आणि त्यानंतर पत्रकारांना सगळे काही आबादीआबाद असल्याचे सांगून मुख्यमंत्री निघून गेले.

सावंत, महाजन आले… इतर पालकमंत्री गायब

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मराठवाडय़ातील दुष्काळाचा आढावा घेण्यात येणार असल्यामुळे आठही जिह्यांच्या पालकमंत्र्यांची उपस्थिती अनिवार्य होती, परंतु धाराशीवचे पालकमंत्री तानाजी सावंत आणि नांदेड आणि लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन बैठकीला आले. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे, हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, परभणी आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे, जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी या बैठकीला दांडी मारली.

पॅकेज, मदत, पंचनामे… मुख्यमंत्री विसरले

आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांना छत्रपती संभाजीनगरात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या 45 हजार कोटींच्या पॅकेजविषयी विचारण्यात आले. त्यावर मुख्यमंत्री शून्यात गेले. अतिवृष्टी, गारपीटग्रस्तांना मदत मिळणार होती त्याचे काय झाले, असे विचारले असता मुख्यमंत्री काही बोललेच नाहीत. चारा द्या, पाणी द्या असे म्हणत मुख्यमंत्री आले तसे भुर्र।़।़ उडाले!

मुख्यमंत्र्यांची पंचतारांकित बडदास्त

दुष्काळाने मराठवाडा भुकेकंगाल झाला आहे. पाण्यासाठी सगळीकडून टाहो पह्डण्यात येत आहे. हाताला काम नसल्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. सोयाबीन, कापूस घरातच पडून असल्याने शेतकरीही हवालदिल झाला आहे, पण ‘राजेशाही’ थाटात वावरणाऱया विभागीय आयुक्तालयाने दुष्काळी मराठवाडय़ात आलेल्या मुख्यमंत्र्यांची ‘पंचतारांकित’ सरबराई केली. मराठवाडी जनतेला पिण्यासाठी पाणी नाही, पण बैठकीसाठी खास मिनरल वॉटरच्या बाटल्या मागवण्यात आल्या. खास कुरकुरीत बिस्किटे, खमंग कुरकुरे, वेगवेगळय़ा प्रकारचे सँडविचेस, पेस्ट्रीज, वेफर्स, केक, काजू, बदाम, पिस्तेही मागवण्यात आले होते.