इम्रान खान यांना तीन वर्षांची शिक्षा, तत्काळ अटक; पाच वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी आणखी वाढल्या असून, त्यांना तोशाखाना प्रकरणात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाखाली इस्लामाबाद न्यायालयाने तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर इम्रान खान यांना लाहोर येथून तत्काळ अटक करण्यात आली आहे. तसेच इम्रान खान यांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावतानाच पाच वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घातली आहे.

तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष, माजी पंतप्रधान इम्रान खान यांना यापूर्वी 9 मे रोजी इस्लामाबाद हायकोर्टातून नाटय़मयरीत्या अटक करण्यात आली होती. अल-कादीर ट्रस्ट जमीन घोटाळ्यात ही अटक झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला होता. मात्र, आता ते तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणात दोषी आढळले आहेत. आज याप्रकरणी इस्लामाबाद ट्रायल कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने इम्रान खान यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावतानाच एक लाख रुपये दंड आणि पाच वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घातली. कोर्टाचा निकाल लागला तेव्हा इम्रान खान लाहोरच्या जमाल पार्क घरात होते. निकालानंतर तत्काळ लाहोर पोलिसांचा ताफा जमाल पार्क येथे धडकला आणि इम्रान यांना अटक केली. सध्या इम्रान खान यांना लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात ठेवण्यात आल्याचे तहरीक-ए-इन्साफ पक्षाने म्हटले आहे.

अटकेपूर्वीच व्हिडीओ रेकॉर्ड करून ठेवला

z आपल्याला अटक होऊन तुरुंगात डांबले जाऊ शकते याचा अंदाज इम्रान खान यांना होता. त्यांनी अटकेपूर्वी एक व्हिडीओ रेकॉर्ड करून ठेवला होता. हा व्हिडीओ आता व्हायरल झाला असून, तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शांत बसू नये, संघर्ष करावा, असे अवाहन केले आहे.

कोटय़वधी किमतीच्या भेटवस्तू विकल्या

z पंतप्रधान, राष्ट्रपतींना विदेश दौऱयावर गेल्यानंतर अनेकदा तेथील प्रमुखांकडून मौल्यवान गिफ्ट मिळतात. या गिफ्ट सरकारी नॅशनल अका&व्हमध्ये जमा कराव्या लागतात. पाकिस्तानात याला तोशाखाना म्हणतात.

z पंतप्रधान असताना इम्रान खान यांनी गिफ्ट म्हणून मिळालेली महागडी घडय़ाळे, दागिने, पेन तोशाखानामध्ये जमा न करता ते परस्पर विकले. यातून कोटय़वधी रुपयांची कमाई इम्रान यांनी केली. इम्रान खान यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्यावरही तोशाखाना भ्रष्टाचाराचा आरोप आहे.