वाजतगाजत, गुलाल उधळीत रविवारी ‘गोड गणपती’चे आगमन

‘गोड गणपती’ म्हणून ओळखल्या जाणाऱया अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचे आगमन रविवार, 3 सप्टेंबर रोजी धूमधडाक्यात होणार आहे. गरुडावर आरूढ झालेली 25 फुटांची शेषशायी मूर्ती मूर्तिकार सिद्धेश दिघोळे यांनी साकारली आहे. वाजत गाजत, गुलाल उधळीत ढोलताशांच्या निनादात रविवारी दुपारी 12.30 वाजता सिद्धेश दिघोळे यांच्या परळ येथील कार्यशाळेतून भव्य आगमन मिरवणूक सुरू होणार आहे. सात रस्ता, मुंबई सेंट्रल, ग्रँट रोड, गिरगावमार्गे चंदनवाडी येथील श्रींच्या मंडपात विराजमान होणार आहे. गणेशभक्तांसाठी आकर्षण असलेल्या आणि पांडुरंग सकपाळ यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या या गोड गणपतीचे स्वागत करण्यासाठी सुमारे दहा ते पंधरा हजार गणेशभक्त ग्रँट रोड, गिरगाव, ठाकूरद्वार, चिराबाजार, चंदनवाडीपर्यंत तासन्तास आतुरतेने वाट पाहत उभे असतात. हा मिरवणुकीचा सोहळा ऐतिहासिक, अभूतपूर्व आणि नेत्रदीपक असल्याने या उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.