गोखले पुलाचे गर्डर बसवण्यास सुरुवात, दिवाळीपर्यंत एक लेन सुरू करणार

अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणार्‍या गोखले पुलाच्या गर्डर बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. अंबाला येथून आणलेल्या पहिल्या गर्डरची जोडणी 50 टन वजन वाहून नेण्याची क्षमता असलेल्या नवीन क्रेनच्या सहाय्याने सुरू करण्यात आली. दिवाळीपर्यंत या पुलाची एक लेन सुरू करण्यासाठी पालिका प्रयत्नशील असल्याचे पूल विभागाकडून सांगण्यात आले.

अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा हा गोखले पूल 1675 मध्ये बांधण्यात आला आहे. या पुलाचा काही भाग 3 जुलै 2018 मध्ये कोसळून दोघांचा मृत्यू झाल्यामुळे या पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. नोव्हेंबर 2022 पासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मात्र हा पूल अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा असल्याने परिसरात वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहतूककोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिकेने पश्चिम रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधत गोखले पुलाचे काम लवकर हाती घेण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी हरयाणा येथील अंबाला येथून 1200टन वजनाचे गर्डर आणण्यात आले आहेत. या गर्डरची जोडणी आता सुरू करण्यात आली आहे, आल्याची माहिती पायाभूत सुविधा उपायुक्त उल्हास महाले यांनी दिली.