धक्कादायक! महाराष्ट्राचा दीड किलोमीटर भूभाग गुजरातने बळकावला

महाराष्ट्रातील उद्योग, सरकारी आणि कॉर्पोरेट कार्यालये आणि नोकऱया गुजरातने पळवल्याच्या घटनांवरून रान उठले असतानाच आता महाराष्ट्रातील गावेही गुजरातने ‘हायजॅक’ केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. गुजरातच्या सोलसुंभा ग्रामपंचयातीने महाराष्ट्राच्या वेवजी गावात तब्बल दीड किलोमीटर इतकी घुसखोरी करत विजेचे पोल ठोकून अतिक्रमण तर केलेच पण या गावातील रस्त्यांचे डांबरीकरणही केले आहे. हे कमी की काय गुगल मॅपने महाराष्ट्रातील वेवजी, गिरगाव, गिमाणीया, संभा आणि आच्छाड या पालघर जिह्याच्या तलासरी तालुक्यातील ग्रामपंचायती थेट गुजरातच्या हद्दीत घुसडल्या आहेत. डहाणूचे माकपचे आमदार विनोद निकोले यांनी गुजरातच्या या घुसखोरीचा भर विधिमंडळात पर्दाफाश केला असून गुजरात आणि गुगलच्या या मोगलाईविरोधात महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात संतापाची लाट उसळली आहे.

महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर पालघर जिह्यातील तलासरी तालुका आहे. गुजरातच्या सोलसुंभा ग्रामपंचायतीने तलासरीच्या वेवजी गावात सरळसरळ तब्बल पंधराशे मीटर म्हणजेच जवळपास दीड किलोमीटर इतकी घुसखोरी केली आहे. वेवजी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्व्हे नंबर 204 चा भूखंड आणि गुजरातच्या सोलसुंभा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्व्हे क्रमांक 103 चा भूखंड, या दोन भूखंडांवर महाराष्ट्र-गुजरातची सीमा आहे. महाराष्ट्राच्या वेवजी गावात गुजरातच्या सोलसुंभा ग्रामपंचायतीने विजेचे पोल ठोकून अतिक्रमण केले आहे. ‘गुजरात राज्याची हद्द सुरू’ असा बोर्ड असलेल्या जागेपासून पंधराशे मीटर आधीच हे स्ट्रीटलाईट बसवण्यात आले आहेत.

महाराष्ट्राच्या प्रशासनाला गुजरातने पाने पुसली

तलासरी तालुक्यातील ज्या वेवजी गावात गुजरातने घुसखोरी केली आहे त्या वेवजी गावाचा सर्व्हे केल्यानंतर हे गाव महाराष्ट्रातच आहे, असा अहवाल भूमिअभिलेख, महसूल खाते आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने पालघर जिल्हाधिकाऱयांना पाठवला आहे. हा अहवाल पालघरच्या जिल्हाधिकाऱयांनी गुजरातच्या सोलसुंभा ग्रामपंचायतीकडे पाठवल्यानंतरही त्याला पाने पुसण्यात आली आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमांची निश्चिती करावी, अन्यथा गुजरातचे मोठे अतिक्रमण महाराष्ट्राच्या सीमेत होत राहील, अशी मागणी डहाणू तालुक्यातील सीमावर्ती ग्रामपंचायतींनी केली आहे.

कोरोना काळापासून मस्ती सुरू; वेवजी गावात घुसून अडथळे उभारले

कोरोनाच्या काळात सुरक्षेसाठी घराबाहेर पडण्यास मनाई असताना त्याचा फायदा घेत गुजरातने तेव्हापासूनच ही मस्ती सुरू केली आहे. महाराष्ट्राच्या वेवजी गावात घुसून गुजरातच्या प्रशासनाने रस्त्यावरच अडथळे उभारले आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील नागरिकांना गुजरातमध्ये जाण्यास बंदी घातली. ही गुजरातची घुसखोरी आहे असा ठराव वेवजी ग्रामपंचायतीने केला. त्यानंतर तलासरीचे तहसीलदार, भूमिअभिलेख अधिकारी आणि ग्रामपंचायतींनी मोजणी करून सीमानिश्चिती केली. परंतु उंबरगावचे (गुजरात राज्य) तहसीलदार प्रदीप झाकड यांनी ही मोजणी बेकायदेशीर असल्याचे सांगितले आणि उंबरगावच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने वेवजीत घुसून डांबरी रस्ते बनवले.

महाराष्ट्र-वेवजीतील इंडिया कॉलनी, एमबीबीआय शाळाही गुजरातच्या नकाशात

ही हद्द महाराष्ट्राची आहे, हे स्ट्रीटलाईटचे पोल काढून न्यावेत असे वेवजी ग्रामपंचायतीने वारंवार कळवून, पत्रव्यवहार करूनही सोलसुंभा ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे. गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर हद्द निश्चिती नसल्याने महाराष्ट्राच्या वेवजीमध्ये गुजरात राज्यातील इमारती उभ्या राहात आहेत. यातच आता वेवजी गावातील इंडिया कॉलनी, दुकाने तसेच एमबीबीआय शाळा या गुगल मॅपमध्ये गुजरात राज्यात असल्याचे दिसत आहे.
एकीकडे महाराष्ट्राच्या वेवजी गावातील गुजरातच्या घुसखोरीचा मुद्दा ऐरणीवर असतानाच आता गिरगाव, गिमाणीया, झाई, संभा, आच्छाड या तलासरी तालुक्यातील सीमेवरील गावेही गुगल मॅपने गुजरातमध्ये घुसवली आहेत. महाराष्ट्रातील गावांवर गुजरातच्या होणाऱया या अतिक्रमणाविरोधात स्थानिकांत प्रचंड संताप खदखदत आहे.

त्रिकोणी कोपऱयाचा आधार घेऊन गुजरातचे अतिक्रमण

बलसाड-उंबरगाव (गुजरात) आणि तलासरी-वेवजी (महाराष्ट्र) या दोन गावांमधून गुजरात आणि महाराष्ट्राची हद्द जाते. परंतु या दोन्ही गावांचे सीमांकन करून हद्द निश्चिती झालेली नाही. दोन्ही राज्यांच्या भूमिअभिलेख खात्यामार्फतच त्याचे सीमांकन निश्चित करावे लागणार आहे. त्यासाठी दोन्ही राज्यांचे सार्वजनिक बांधकाम खाते विभाग, स्थानिक ग्रामपंचायती, भूमिअभिलेख आणि महसूल खात्याच्या परवानगीने ही हद्द अंतिम करावी लागणार आहे. तलासरी-वेवजीतील स्थानिक नागरिकांनी वारंवार मागणी करूनही पालघरच्या प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्यानेच हद्दीच्या त्रिकोणी कोपऱयाचा आधार घेऊन महाराष्ट्राच्या जवळपास पंधराशे मीटर सीमेपर्यंत गुजरातने अतिक्रमण केले आहे.

अन्यथा जनतेच्या संतापाचा उद्रेक होईल

गुजरातने महाराष्ट्रातील गावात केलेली घुसखोरी गंभीर आहे. सरकारने महाराष्ट्र – गुजरात वाद तात्काळ निकाली काढावा अन्यथा जनतेच्या संतापाचा उद्रेक होईल, या आक्रोशाला सरकारने तयार राहावे असा इशारा माकपचे आमदार विनोद निकोले यांनी दिला.