अमेरिकेतील हिंदुस्थानी दूतावासाचे कार्यालय पेटवून दिले, खलिस्तान समर्थकांच्या हिंसाचाराचा अमिरेकेनेही केला निषेध

सॅन फ्रॅन्सिस्को भागात असलेले हिंदुस्थानी दूतावासाचे कार्यालय पेटवून देण्यात आलं आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास ही आग लावण्यात आली आहे. ही जाळपोळ खलिस्तानी समर्थकांनी केल्याचा दाट संशय आहे. गेल्या पाच महिन्यात दूतावासावर हल्ला केल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी मार्च महिन्यातही हिंदुस्थानी दूतावासाची तोडफोड करण्यात आली होती. या हिंसाचाराचा अमेरिकेने निषेध केला आहे.

अमेरिकेतील स्थानिक वाहिनी असलेल्या दिया टीव्हीने एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. हा व्हिडीओ खलिस्तान समर्थकांनीच व्हायरल केल्याचं या वाहिनीने म्हटलं आहे. या जाळपोळीत कोणालाही दुखापत झालेली नाही. ही आग अग्निशमन दलाने काही मिनिटांमध्ये आटोक्यात आणली. या हल्ल्याचा अमेरिकेने निषेध केला असून प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी म्हटलंय की अमेरिकेतील दूतावासाची इमारत किंवा राजदूतांवर हल्ला हा गुन्हा आहे.

ऑपरेशन ब्लू स्टारचा 6 जून रोजी वर्धापनदिन होता. त्या दिवशी हजारो शीख कुटुंबे कॅलिफोर्नियातील दक्षिण फ्रान्सिस्को येथील सिव्हिक सेंटरच्या बाहेर जमली होती. यामध्ये खलिस्तानी समर्थकही होते आणि त्यांनी खलिस्तानी झेंडे फडकावले होते. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्येही खलिस्तान समर्थकांनी हिंसाचार, तोडफोड केली असून हे लोण विविध देशांत पसरत चालले आहे.