सोबर्सच्या भेटीने हिंदुस्थानी क्रिकेटपटू भारावले

वेस्ट इंडीजच्या स्वारीवर गेलेला हिंदुस्थानी क्रिकेट संघ बार्बाडोसमध्ये दाखल झाला आहे. मंगळवारी त्यांनी सरावासही प्रारंभ केला. दरम्यान, विंडीजचे म्माजी अष्टपैलू खेळाडू सर गारफिल्ड सोबर्स यांची हिंदुस्थानी क्रिकेटपटूंनी आवर्जून भेट घेतली. या महान क्रिकेटपटूच्या भेटीने हिंदुस्थानी क्रिकेटपटू भारावले होते.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेने विंडीज दौऱयाची सुरुवात करणार आहे. 12 जुलैपासून पहिल्या कसोटीस प्रारंभ होणार आहे, तर त्यानंतर तीन वन डे व 5 टी-20 सामन्यांची मालिका रंगणार आहे. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहलीसह टीम इंडियातील अनेक खेळाडूंनी  गारफिल्ड सोबर्सशी हस्तांदोलन करून स्वतःला धन्य समजले. वार्धक्याकडे झुकलेले सोबर्स सपत्नीक हिंदुस्थानी क्रिकेटपटूंच्या भेटीला आले होते. सर्व खेळाडूंनी त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळानेही  (बीसीसीआय) ‘बार्बाडोसमध्ये आणि महानतेच्या सहवासात’ अशा पॅप्शनसह या संस्मरणीय भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला. रोहित, विराट यांच्यानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सोबर्स यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर द्रविडने शुभमन गिल, शार्दुल ठाकूर यांचीही सोबर्स यांच्याशी भेट घालून दिली. त्यानंतर रविचंद्रन अश्विनही त्यांच्याशी चर्चा करताना दिसला.

सहा चेंडूंवर सलग सहा षटकार ठोकणारे सर गारफिल्ड सोबर्स  हे क्रिकेटविश्वातील पहिले फलंदाज होते. 1954 ते 1974 हा काळ खऱया अर्थाने सोबर्स यांनी गाजवला. आता टी-20च्या जमान्यात याचे फारसे अप्रूप राहिलेले नसेलही, मात्र कसोटी क्रिकेटच्या जमान्यात सलग सहा षटकार मारणे ही त्यावेळी खूप मोठी गोष्ट होती. त्यावेळच्या प्रत्येक क्रिकेटपटूचे गारफिल्ड सोबर्स हे आयडॉल असायचे, इतके ते महान क्रिकेटपटू होते.