उजनी बोट दुर्घटनेतील सर्व सहा मृतदेह सापडले

उजनी धरणाच्या जलाशयात मंगळवारी (दि. 21) प्रवासी वाहतूक करणारी बोट उलटून झालेल्या अपघातामध्ये करमाळा तालुक्यातील कुगाव आणि झरे या गावातील बेपत्ता झालेल्या सर्व सहा प्रवाशांचे मृतदेह तब्बल 36 तासांनंतर नैसर्गिकरीत्या पाण्यावर तरंगत वर आले. एनडीआरएफच्या जवानांनी सर्व मृतदेह जलाशयातून बाहेर काढत पुढील कार्यवाहीसाठी करमाळा येथे पाठवले. मृतदेह पाहून नातेवाईकांनी पह्डलेला हंबरडा काळजाचा घाव घेणारा होता. दरम्यान, सर्व मृतदेहांवर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

गोकुळ ऊर्फ कृष्णा दत्तात्रय जाधव ( 30), त्यांची पत्नी कोमल गोकुळ जाधव (25), मुलगा समर्थ गोकुळ जाधव (दीड वर्ष), मुलगी वैभवी गोकुळ जाधव (3) हे संपूर्ण कुटुंब तसेच गौरव धनंजय डोंगरे (24) व बोट चालक अनुराग अवघडे (26) अशी मृतांची नावे आहेत.