शेअर बाजाराचा ऐतिहासिक उच्चांक!

सेन्सेक्स आणि निफ्टीने गुरुवारी एक नवीन इतिहास रचला. सेन्सेक्सने 1.6 टक्क्यांची झेप घेत ‘ऑल टाईम हाय’ म्हणजेच आतापर्यंतचा सर्वात मोठा 75,419 अंकांचा उच्चांक गाठला, तर दुसरीकडे निफ्टीनेसुद्धा 22,967 अंकांचा नवा रेकॉर्ड बनवला. निफ्टी 23 हजार अंकाच्या खूप जवळ पोहोचला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीने बाजारात उच्चांक गाठल्याने गुंतवणूकदारांची अक्षरशः चांदी झाली आहे.

गुंतवणूकदारांनी एका झटक्यात 4.15 लाख कोटी रुपये कमावले आहेत. फार्मा आणि मेटलला वगळता बीएसईच्या सर्व सेक्टरमधील इंडेक्समध्ये आज ग्रीन आकडे दिसले. बीएसई मिडकॅप इंडेक्स 0.58 टक्के तर स्मॉलकॅप इंडेक्स 0.27 टक्क्यांच्या वाढीसोबत बंद झाले. बीएसई सेन्सेक्स 1196 अंक म्हणजेच 1.61 टक्क्यांच्या वाढीसोबत 75,419 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 396 अंकांच्या वाढीसोबत 22,967 अंकांवर बंद झाला. एलटी, आयसीआयसीआय बँक, ऑक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि रिलायन्सच्या समभागांच्या वाढीमुळे सेन्सेक्स वाढला आहे. एलटी आणि ऑक्सिस बँकेचे शेअर्स सुमारे 3 टक्के वाढले आहेत. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि रिलायन्सचे शेअर्स सुमारे एक टक्का वाढले आहेत.

टॉप पाच शेअर्स – महिंद्रा अँड महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो, ऑक्सिस बँक, मारुती सुझुकी आणि अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ पाहायला मिळाली.
तीन शेअर्स घसरले -आज केवळ तीन शेअर्समध्ये घसरण झाली. यात सन फार्मा, पॉवर ग्रिड आणि एनटीपीसीच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

गुंतवणूकदारांची चांदी
बीएसई लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन गुरुवारी 420.09 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. बुधवारी हे 415.94 लाख कोटी रुपये होते. तसेच बीएसई लिस्टेड कंपन्यांचे मार्पेट कॅप आज 4.15 लाख कोटी रुपये वाढले आहे. गुंतवणूकदारांनी 4.15 लाख कोटी रुपये कमावले.