IPL 2024 : आशुतोष-शशांकच्या वादळापुढे गुजरात उद्ध्वस्त, पंजाबचा तीन विकेट्सने दणदणीत विजय

पंजाब विरुद्ध गुजरात टाययन्य यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यात पंजाबने तीन विकेट्सने गुजरातचा पराभव केला. 200 धावांच्या बलाढ्य लक्षाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पंजाबची सुरुवात खराब झाली होती. मात्र आशुतोष शर्मा (17 चेंडू 31 धावा) आणि शशांक सिंग (29 चेंडू 61 धावा) या युवा खेळाडूंनी केलेल्या ताबडतोब फलंदाजीमुळे विजय पंजाबच्या पारड्यात पडला.

नाणेफेक जिंकून पंजाबने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. फलंदाजीसाठी आलेल्या गुजरातला रिद्धीमान सहाच्या (11) स्वरुपात पहिला धक्का अवघ्या 29 या धावसंख्येवर बसला. कर्णधार शुभमन गिलने एका बाजूने संयमी खेळ सुरु ठेवला आणि 4 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 89 धावांची आक्रमक खेळी केली. गिलला विल्यमसन (26), साई सुदर्शन (33) आणि राहुल तेवतीया (23) यांनी चांगली साथ दिली आणि गुजरातने 199 धावा करत 200 धावांचे लक्ष पंजाबला दिले.

लक्षाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पंजाबची सुरुवात खराब झाली. अवघ्या 13 या धावसंख्येवर कर्णधार शिखन धवनच्या (1) स्वरुपात मोठा धक्का पंजाबला बसला. बेअरस्टो (22), प्रभासिमरन (35), सॅम करन (5), सिकंदर रझा (15) यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. 70 या धावसंख्येवर पंजाबने चार विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर आलेल्या शशांक सिंग आणि आशुतोष शर्माने पंजाबचा डाव सावरला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर पंजाबने बाजी मारली.