राम मंदिरापेक्षा महागाई आणि बेरोजगारीवर बोला

या देशात आज राम मंदीर ही महत्त्वाची समस्या आहे का बेरोजगारी आणि महागाई असा सवाल काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी विचारला आहे. रा मंदिराचे जानेवारी 2024 मध्ये उद्घाटन होत असून या पार्श्वभूमीवर बोलत असताना त्यांनी हा सवाल केला आहे. पंतप्रधान हे सगळ्या देशाचे असतात एका पक्षाचे नसतात. देशात 60 टक्के लोकं अशी आहेत ज्यांनी भाजपला मतदान केलेले नाही. पंतप्रधान हे त्यांचेही असतात असे पित्रोदा यांनी म्हटले. पंतप्रधानांनी रोजगार, महागाई, विज्ञान आणि तंत्रज्ञानसोबतच देशासमोर असलेल्या आव्हानांबाबत बोलले पाहिजे. देशासमोरील खरी आव्हाने, खरे मुद्दे कोणते आहेत हे ओळखणे गरजेचे आहे. राम मंदिर हा देशासमोरचा खरा मुद्दा आहे का बेरोजगारी आणि महागाई हा देशासमोरील खरा मुद्दा आहे ? असा सवाल पित्रोदा यांनी विचारला आहे.

ईव्हीएमबाबतच्या शंकांकडे दुर्लक्ष करणे चुकीचे

आपल्या धर्माचा पुरस्कार करणे, त्याचे आचरण करणे यात चुकीचे काहीच नाही मात्र धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ करणे चुकीचे असल्याचे पित्रोदा यांनी म्हटले आहे. पित्रोदा यांनी इंडिया आघाडीतील घटक पक्षांकडून उपस्थित करण्यात आलेल्या ईव्हीएमबाबतच्या शंकांवर लक्ष देण्याची गरज असल्याचे मत यक्त केले आहे. 2024 ची निवडणूक ही देशाचे भवितव्य ठरवणारी आहे त्यामुळे ईव्हीएमबाबत उपस्थित करण्यात आलेल्या शंकांकडे दुर्लक्ष करू चालणार नाही असे पित्रोदा यांनी म्हटले. ईव्हीएमबाबत उपस्थित करण्यात आलेल्या शंका हा साधा विषय नाहीये आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी हा विषय अत्यंत गांभीर्याने हाताळला पाहिजे असे पित्रोदा म्हणाले.