जालना लाठीमाराचा देवगडमध्ये निषेध; दोषींवर कारवाई करा, तहसीलदारांना दिले निवेदन

जालना येथील मराठी समाजाच्या आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीमाराचा जाहीर निषेध व लाठीचार्ज करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीने देवगड तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय ,जय भवानी जय शिवाजी, एक मराठा, लाख मराठा,अशा घोषणांनी देवगड तहसील कार्यालय परिसर दुमदुमून गेला होता.

देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी सकाळी देवगड एसटी स्टँड ते तहसील कार्यालयावर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना येथे शांततेने उपोषणास बसलेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर अमानुषपणे पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेत अनेकजण जखमी झाले. या घटनेबाबत राज्यभरातून संताप व्यक्त करत निषेध करण्यात येत आहे. या घटनेचा देवगड तालुका मराठा समाज यांच्यावतीने जाहीर निषेध करत असून लाठीमाराचा आदेश देणारे पोलीस अधिकारी प्रत्यक्ष कार्यवाही करणारी पोलीस अधिकारी व संबंधितांवर शासनाकडून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीने या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी देवगड तालुका अध्यक्ष संदीप साटम, उपाध्यक्ष मिलिंद माने, सरचिटणीस केदार सावंत,कोषाध्यक्ष किसन सूर्यवंशी ,निशिकांत साटम, दयानंद पाटील, अमित साटम ,बंटी कदम तसेच अन्य मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मराठा समाज बांधवांच्या वतीने देवगड तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. पुढील काळात देखील मराठा समाजावर आरक्षणाबाबत अन्याय झाल्यास शांततेच्या मार्गाने यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही मराठा समाज बांधवांच्या वतीने देण्यात आला आहे.