कोल्हापूर शहरात आज ‘बंद’

जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीहल्ल्याचा निषेध आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सकल मराठा समाजाने उद्या (दि. 5) ‘कोल्हापूर शहर बंद’ची हाक दिली आहे. ऐतिहासिक दसरा चौक येथे मंगळवारी सकाळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ‘बंद’चे आवाहन करण्यासाठी दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे.

दरम्यान, कोणालाही त्रास न होता अत्यावश्यक सेवा वगळता, एसटी, केएमटी बससेवा बंद ठेवण्यात येणार आहे. उत्स्फूर्त बंद काय असतो, ते उद्या कोल्हापूरकर दाखवून देतील, असा इशारा सकल मराठा समाजाने सरकारला दिला आहे.

आज सकाळी दसरा चौकात एकत्र आलेल्या मराठा समाजाचे विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी सत्ताधाऱयांचा निषेध करण्यात आला. सकल मराठा समाजाचे निमंत्रक वसंत मुळीक यांनी या आंदोलनामागील भूमिका स्पष्ट करत जालन्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षकांना निलंबित करा, लाठीहल्ल्याची न्यायालयीन चौकशी व्हावी आणि गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्या केल्या. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी ‘कोल्हापूर शहर बंद’चे आवाहन केले. याला उपस्थित सर्वांनीच पाठिंबा दिला.

बुधवारी इचलकरंजी ‘बंद’

सकल मराठा समाजाच्या वतीने जालना येथील लाठीहल्ल्याचा निषेध म्हणून बुधवारी (दि.6) ‘इचलकरंजी बंद’ची हाक देण्यात आली आहे. शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. बुधवारी सकाळी शहरातील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात येणार आहे. संतोष सावंत, पुंडलिक जाधव, मोहन मालवणकर, अरविंद माने आदी उपस्थित होते.

शिरोळ तालुका कडकडीत बंद

मराठा बांधवांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या ‘बंद’ला आज शिरोळ तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काल जयसिंगपूर येथे शिरोळ तालुका मराठा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत ‘शिरोळ तालुका बंद’ची हाक देण्यात आली होती. यामुळे आज व्यापाऱयांनी आपले व्यवहार बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदवला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी शहराच्या प्रमुख मार्गावरून दुचाकी रॅली काढली होती.