Lok Sabha Election 2024 : ज्यांना अटक होण्यापासून वाचविले तेच आज विरोधात – नितीन गडकरी

काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते माझ्याकडे त्यांच्या कामासाठी आले, परंतु आज तेच माझ्याविरोधात प्रचार करत आहेत. अटक होऊन तुरुंगात जाण्यापासून मी ज्यांना वाचवले होते तेसुद्धा आज माझ्याविरोधात प्रचार करत आहेत, अशी खंत भाजप उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार नितीन गडकरी यांनी ‘वचननामा ते वचनपूर्ती’ हा आपला जाहीरनामा जाहीर केला. यामध्ये त्यांनी गेल्या दहा वर्षात नागपूरमध्ये केलेली विकासकामे आणि पुढील पाच वर्षांत करण्यात येणाऱया विकासकामांचा आलेख मांडला. यावेळी गडकरी म्हणाले, गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून शहरातील विविध भागात प्रचार सुरू असताना लोकांचा प्रतिसाद मिळतो. मात्र, माझ्यासोबत काम करणारे किंवा ज्यांना मी अनेक कामात मदत केली आहे असे अनेक काँग्रेसचे कायकर्ते व नेते माझ्याविरोधात प्रचार करत आहेत. पण ज्यांना मी वेळोवेळी मदत केली अशी लोकं आज माझ्याविरोधात गेली आहेत.

– शहरात दोन-तीन दिवसांपूर्वी एक पदाधिकारी विरोधात फिरत होते, जे तुरुंगात जाण्याच्या स्थितीत होते. त्यांना अटक होण्यापासून मी वाचवले आहे. मात्र, ते आज विरोधात प्रचार करत आहे. त्याला माझा काही आक्षेप नसून मी विरोधात असलेल्यांची कामे केली आहेत. मी कधीही जातीभेद किंवा पक्षभेद केला नाही. जो माझ्याकडे आला आहे त्याचे काम केले, असेही गडकरी म्हणाले.