मोदींचे सरकार घालवणार; गरीबांच्या खात्यात 1 लाख रुपये टाकणार

नरेंद्र मोदी यांची सत्ता आल्यापासून महागाई प्रचंड वाढली आहे. स्वयंपाकाचा गॅस 1100 रुपयांवर पोहोचला… जगायचे कसे, नवरा नाही, तीन मुली आहेत, तरुण आहेत. कसे घर चालवायचे… इंडिया गेटवर पाणी, कोल्ड्रिंक्स विकते. पण, पोलीस त्रास देतात. हृदयविकार आहे, उपचार करायला पैसे नाहीत… अशा असंख्य महिलांच्या व्यथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ऐकून घेतल्या. यावेळी राहुल गांधी यांनी सर्व महिलांची जबाबदारी घेत गरीब महिलांच्या खात्यात दर महिन्याला साडेआठ हजारप्रमाणे वर्षाला एक लाख रुपये टाकण्याचे आश्वासन दिले.

दिल्लीत अनेक महिलांनी राहुल गांधी यांच्यापुढे व्यथा मांडल्या. कुणाचा नवरा दारू पितो तर कुणाचा नवराच नाही. एकटय़ा महिलेने संपूर्ण घराची जबाबदारी स्वीकारली आहे. कुणी महिला गाडय़ांवर भाजी विकण्याचे किंवा खाद्यपदार्थ विकण्याचे काम करते. परंतु, त्यांना व्यवसायही करता येत नाही. महिलांच्या व्यथा ऐकून राहुल गांधीही भावुक झाले. त्यांनी महिलांना धीर दिला. प्रत्येक महिलेला आपल्या व्यथा मांडण्याची संधी मिळाली. राहुल गांधींनीही अतिशय बारकाईने त्यांच्या व्यथा ऐकून त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, राज्यघटना वाचवण्यासाठी आपली लढाई असून आपले सरकार आल्यानंतर वेंडर अॅक्टसह अनेक कायदे पुन्हा आणू आणि लोकशाही वाचवू, असे आश्वासनही त्यांनी दिले.