अयोध्येला नेल्याने पत्नीने केली घटस्फोटाची मागणी, 5 महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न

कौटुंबिक न्यायालयांमध्ये घटस्फोटाची अनेक चित्रविचीत्र प्रकरणे येत असतात. अगदी शुल्लक कारणांवरून सुद्धा घटस्फोट झाल्याची अनेक प्रकरणे घडली आहेत. गोव्याला न नेता अयोध्येला नेल्याने पत्नीने घटस्फोटाची मागणी केल्याचे एक विचित्र प्रकरण कौटुंबिक न्यायालयात दाखल झाले आहे.

भोपाळ, मध्य प्रदेशमध्ये सदर प्रकरण घडले आहे. रिया (बदलेले नाव) आणि (कमलेश) बदलेले नाव यांचे ऑगस्ट 2023 मध्ये लग्न झाले होते. रियाला हनिमूनसाठी परदेशात जायचे होते. पण हनिमूनसाठी गोव्याला जाण्याचे वचन कमलेशने रियाला दिले होते. त्यामुळे रिया सुद्धा खूश होती. पण एनवेळी नियोजन बदलले आणि गोव्याला न जाता कमलेश रियाला अयोध्या आणि वाराणसीला घेऊन गेला. त्यामुळे रियाचा चांगलाच हिरमोड झाला. नाराज झालेल्या रियाने हनिमूनवरून परतल्यानंतर दहा दिवसांनी शुक्रवारी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला.

रियाने दिलेल्या माहितीनूसार, कमलेश आयटी क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी करतो. त्यामुळे परदेशात हनिमूनसाठी घेऊन जाणे त्याच्यासाठी कठीण नव्हते. पण कमलेशने रियाला परदेशात नेले नाही. कमलेशला त्याला त्याच्या आई वडिलांची काळजी होती म्हणुन त्याने हिंदुस्तानातील गोवा आणि दक्षिण हिंदुस्तानात जाण्याचे निश्चित केले होते.

अचानक कमलेशने आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी अयोध्या आणि वाराणसीला जाण्यासाठी विमानाचे तिकीट बुक केले. कारण राम मंदीराच्या प्राणप्रतिष्ठेपुर्वी त्यांना अयोध्येला जायचे होते. याची रियाला काहीही कल्पना नव्हती. अयोध्येला जाण्याच्या आदल्या दिवशी कमलेशने याची कल्पना रियाला दिली. तेव्हा मात्र रियाने शांत राहणे पसंत केले, पण जेव्हा ते सर्व अयोध्येवरून परतले तेव्हा मात्र रियाचा राग उफाळून आला आणि 10 दिवसांनी घटस्फोट घेण्यासाटी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली.  पतीला माझ्यापेक्षा घरातील इतर सदस्यांची जास्त काळजी असल्याची रियाने तक्रार केली आहे. भोपाळ कौटुंबिक न्यायालयातील वकील शैल अवस्थी यांनी सांगितले की या जोडप्याच्या समुपदेशनासाठी प्रयत्न केले जात आहेत.