महाडमध्ये भूगर्भातून स्फोटासारखे आवाज , कसबे शिवथर, कुंभे शिवथर, चेराववाडीतील ग्रामस्थांमध्ये घबराट

महाड तालुक्यातील कसबे शिवथर, कुंभे शिवथर आणि चेराववाडी परिसरात दोन दिवसांपासून भूगर्भातून स्फोटासारखे आवाज येत असल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. सायंकाळी चारच्या नंतर दीड ते दोन तासांच्या अंतराने परिसरात सहा धमाके झाले. त्यामुळे ग्रामस्थांंची एकच पळापळ उडाली. सकाळी या तिन्ही गावातील ग्रामस्थांनी डोंगरावर जाऊन कुठे भेगा पडल्या आहेत का याची पाहणी केली. कोणाच्या घराला तडे गेले नाहीत ना, याचीही खात्री करून घेतली. जिल्हा प्रशासनानेही धाव घेऊन सर्व परिसराची पाहणी केली आहे.

महाड तालुक्यातील पारमाची गावातील घरांना तडे गेले आणि जमिनीत उंचवटे निर्माण झाले. हा प्रकार ताजा असतानाच गेल्या दोन दिवसांपासून कुंभे शिवथर, कसबे शिवथर आणि चेराववाडी परिसरात जमिनीतून स्फोटासारखे आवाज येत आहेत. या प्रकाराची माहिती मिळताच महाडचे प्रांताधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे, तहसीलदार महेश शितोळे, मंडळ अधिकारी काळे यांनी एनडीआरएफच्या टीम आणि आपत्ती निवारण दलासह कसबे शिवथर गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. याप्रसंगी सरपंच रमेश सकपाळ व पोलीस पाटील श्रेया गुरव उपस्थित होते.

उद्या भूगर्भतज्ज्ञांचे पथक येणार

एनडीआरएफच्या टीमने गावाच्या आजूबाजूचा परिसर व पांडवकालीन शंकर मंदिराच्या परिसराची पाहणी केली. मात्र त्यांना कोठे जमिनीला भेगा पडल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे या परिसराची पाहणी करण्यासाठी भूगर्भतज्ज्ञ बोलावण्यात आले आहे. त्यांचे पथक येत्या सोमवारी या ठिकाणी पाहणी करणार आहे. त्यांच्या अहवालानंतर आवाजाचे कारण समजू शकणार आहे, असे प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांनी सांगितले.