महाराष्ट्रावर पुन्हा दरोडा; मिंधे हतबल, 50 हजार कोटींचा ‘गेल’ प्रकल्पही गेला!

नोकरीच्या आशेने लाखो बेरोजगार वणवण करत असताना आज महाराष्ट्रावर पुन्हा दरोडा पडला. महाराष्ट्रात येऊ घातलेला 50 हजार कोटींचा गेल प्रकल्पही मिंधे सरकारच्या नाकर्तेपणामुळे हातचा गेला. छत्रपती संभाजीनगर किंवा दाभोळ येथे हा प्रकल्प होणार होता. पण तो मध्य प्रदेशात गेला. गेल ही सरकारी कंपनी असल्याने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनेच हा प्रकल्प महाराष्ट्रातून परराज्यात पळवला असा आरोप होत आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती देतानाच मिंधे सरकारला जाब विचारला आहे. गेल इंडिया पेट्रोकेमिकल्स कंपनी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर किंवा दाभोळ येथे 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून व्रॅकिंग युनिट उभारणार होती. आता हा प्रकल्प महाराष्ट्रात न येता मध्य प्रदेशच्या सिहोर येथे उभारला जाणार आहे, असे दानवे यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

सरकारने याचे उत्तर द्यावे…
अंबादास दानवे यांनी यासंदर्भात पुढील प्रश्न उपस्थित करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची उत्तरे द्यावीत, अशी मागणी केली आहे.
n महाराष्ट्रात येण्याचा विचार करणारी ही कंपनी अचानक मध्य प्रदेशात कशी गेली?
n महाराष्ट्राचा वाटय़ाला येणारा रोजगार असा सहज बाहेर कसा गेला?
n या कंपनीने प्रकल्प उभारणीच्या जागेसाठी विचारणा केली होती का?
n महाराष्ट्रात जागा हवी होती तर त्यांनी महाराष्ट्रात प्रकल्प का नाकारला?
n सरकारी कंपनी असल्याने मध्य प्रदेशात हा प्रकल्प नेण्यासाठी केंद्राने दबाव टाकला का?

…हे भाजपचेच पाप
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रावर बेगडी प्रेम दाखवत आहेत. इथे येणारी गुंतवणूक सतत परराज्यात जात आहे. राज्यातील तरुणांच्या हाताला मिळणार रोजगार हिसकावून दुसऱयाच्या घशात घालण्याचे हे पाप भाजपचेच आहे, असा आरोपही अंबादास दानवे यांनी केला आहे.