शालेय प्रवेशासाठी लागणारे दाखले देण्यासाठी पर्यायी व्यवस्था करा

मुंबईत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी व म्हाडाच्या घरांसाठी आवश्यक असणारे दाखले, प्रमाणपत्र महाऑनलाईनच्या माध्यमातून मिळतात. मात्र सध्या मुंबईतील महाऑनलाईनची व्यवस्था पुरती कोलमडल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्याची दखल घेत सरकारने पर्यायी व्यवस्था करून गरजूंना दाखले उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली आहे.

महाऑनलाईनची व्यवस्था कोलमडल्याने मुंबईतील विद्यार्थी व पालकांच्या सेतू पेंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागलेल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रमाणपत्रे दाखल करण्यासाठी महसूल विभागाने मुदतवाढ दिली आहे. ही बाब चांगली असली तरी दाखले व प्रमाणपत्रे मिळविणाऱया विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने ही समस्या सुटेल असे वाटत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची व नागरिकांची होणारी परवड लक्षात घेता दाखले व प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अतिरिक्त व्यवस्था सुरू करण्याची मागणी वर्षा गायकवाड यांनी पत्राद्वारे केली आहे.