आदेश गृहमंत्रालयाने दिले मग पोलिसांवर कारवाई का?

जालन्यात शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱया मराठा आंदोलकांवर झालेला लाठीमार दुर्दैवी आहे. गृहमंत्रालयाने आदेश दिला म्हणून हा लाठीचार्ज झाला, असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. मराठा समाज एकत्र येत आहे हे पाहून पोलीस अधीक्षकांना बळीचा बकरा बनवत सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. निवृत्त न्यायाधीशांकडून या संपूर्ण घटनेची चौकशी करावी. त्यानंतर माझ्या बोलण्यात किती तथ्य आहे हे समोर येईल, असेही देशमुख यावेळी म्हणाले.

प्रफुल्ल पटेलांवर टीकास्त्र

प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक ज्येष्ठ नेते होते. त्यांना शरद पवारांनी अनेक पदे, अधिकार  दिले, पण आता तेच पटेल आपल्या 83 वर्षीय बापाला त्रास देत आहेत, भाजप आणि नरेंद्र मोदी यांचे गुणगान गात आहेत, हे दुर्दैवी आहे, अशी तिखट टीका अनिल देशमुख यांनी केली.