Maratha Reservation फडणवीसांची माफी, पण आंदोलक राजीनाम्याच्या मागणीवर ठाम

जालन्यात मराठा आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार करणाऱ्या मिंधे सरकारने आज हात वर केले. लाठीमाराचे आदेश सरकारने दिलेच नव्हते असे सांगत या प्रकरणी पोलिसांना बळीचा बकरा बनवण्यात आले आहे. मराठा समाजाचा संताप टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री व गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेत लाठीमाराबद्दल मराठा समाजाची माफी मागितली. मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी त्याबाबत माहिती दिली.

जालन्यात झालेली घटना ही दुर्दैवी होती आणि लाठीमाराचे समर्थन करता येणार नाही, असे या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले. यापूर्वीही मी गृह मंत्री असताना मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर राज्यात दोन हजार आंदोलने झाली होती, परंतु कधीही बळाचा वापर झाला नाही, असा दावाही त्यांनी केला. लाठीमारात जखमी झालेल्या नागरिकांची मी माफी मागतो, असे ते म्हणाले.

निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. मात्र हे आरक्षण कोर्टात टिकले पाहिजे. आतापर्यंत ज्या राज्यांनी आरक्षणाची मर्यादा ओलांडली त्यांचे आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झाले आहे. त्यामुळे हा निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागणार आहे, असे फडणवीस या वेळी म्हणाले.

अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील गरजू तरुणांना रोजगार दिला जात आहे, अशी सारवासारवही फडणवीस यांनी या वेळी केली. महाविकास आघाडीने सर्वोच्च न्यायालयात योग्य बाजू न मांडल्याने मराठा समाजाचे आरक्षण गेले, असा आरोपही फडणवीस यांनी केला.   दरम्यान, फडणवीसांनी माफी मागून चालणार नाही. त्यांचा राजीनामाच हवा, असा पवित्रा मराठा आंदोलकांनी घेतला आहे.

लाठीमार एसपी, डीवायएसपींनी केला

देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी लाठीमाराची जबाबदारी जाहीरपणे टाळली. लाठीमाराचे आदेश मंत्रालयातून दिले जात नाहीत तर जिह्याचे एसपी आणि डीवायएसपींना ते अधिकार असतात असे सांगत सर्व प्रकरण फडणवीसांनी पोलिसांवर ढकलले.

जीआरवरून दिशाभूल मिंधे सरकारकडून आंदोलकांची फसवणूक

जालन्यात आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची मिंधे सरकारकडून फसवाफसवी सुरू आहे. एका मंत्र्याने जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या मागणीप्रमाणे सरकार जीआर काढेल आणि तो उद्याच घेऊन येतो असे आश्वासन दिले होते, परंतु जरांगे यांच्या मागणीप्रमाणे कुणबी दाखले देण्यास अजून वेळ लागेल असे मुख्यमंत्री म्हणाले.