मराठवाडय़ाच्या पाच जिह्यांत कडकडीत बंद

आंतरवाली सराटी येथे निष्पाप मराठा आंदोलकांवर झालेल्या प्राणघातक लाठीहल्ल्याचे  पडसाद आज सोमवारीही उमटले. मराठवाडय़ाच्या छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर जिह्यांत ‘एक फुल दोन हाफ’ सरकारविरोधात असंतोषाचा भडका उडाला. हिंगोलीत टायर जाळले. नांदेड जिह्यात आंदोलकांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला तर छत्रपती संभाजीनगरात आंदोलकांनी मिंधे सरकारला बांगडय़ांचा आहेर दिला. संतप्त तरुणांनी सरकारला खेटरंही दाखविले. परभणीत बाजारपेठेत चिटपाखरूही नव्हते. लातूर जिल्हा रास्ता रोको तसेच ठिय्या आंदोलनांनी दुमदुमला. हिंगोलीत उत्स्फूर्तपणे 100 टक्के बंद पाळण्यात आला. बीड जिह्यात गेवराई येथे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. बीड जिल्हय़ात डोंगरकिन्ही येथे तरुणांनी अन्नत्याग सुरू केला आहे.

आज सोमवारी छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, हिंगोली तसेच लातूर जिह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. मराठा आंदोलकांच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी रास्ता रोको, ठिय्या आंदोलने करण्यात आली. नांदेड जिह्यात अर्धापूर येथे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळण्यात आला. किनवट येथे समाधान उटकर या तरुणाने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतले. माहूर तालुक्यात धनोडा येथे पैनगंगा नदीपात्रात तरुणांनी मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला.

गंगाखेड येथे तरुणांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. पोखर्णी फाटा, नांदापूर येथे ‘रास्ता रोको’ करण्यात आला.

घनसावंगी तालुक्यातील भोगगाव येथे गणेशराव मुळे, पुंजाराम जाधव, सुभाष सराटे, कार्तिक जाधव तसेच रामा जाधव हे पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. उपोषणार्थींपैकी दोघांची प्रकृती बिघडली आहे.  दरम्यान, गणेशराव मुळे यांनी आपल्या दोन्ही मुलांचे दाखले शाळेतून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आजपासून आझाद मैदानात आमरण उपोषण

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या, मंगळवारपासून आझाद मैदान येथे आमरण उपोषण पुकारण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चाचे अमोल जाधवराव यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा या मागणीसाठी आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

लाचारांना मराठे चोपून काढतील

मराठा समाजाच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत लोकशाहीतील मराठा प्रतिनिधी घेणे गरजेचे होते. परंतु यांनी स्वतःचेच लोक या उपसमितीत भरले. त्यामुळे ही उपसमितीच आम्हाला मान्य नाही, असे मराठा महासंघाचे पदाधिकारी रमेश आंब्रे यांनी बजावले. या सरकारने मराठा समाजामध्ये फूट पाडून आमची लोकं फोडली आहेत. हे धंदे आता सरकारने बंद करावेत. यापुढे मराठा फुटणार नाही आणि जे लाचार होतील त्यांना मराठा समाज चोपून काढेल, असा इशाराही या वेळी देण्यात आला.

एसटीच्या दिवसभरात 6200 फेऱया रद्द

आंदोलनाचा मोठा फटका एसटीला बसला असून दिवसभरात 47 आगारातील एसटीच्या 6200 फेऱया रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे सोमवारी एका दिवसात एसटीला सुमारे दोन कोटी 60 लाख रूपयांचा आर्थिक फटका बसला आहे.  गेल्या तीन दिवसात 20 बस जाळल्या असून 19 गाडय़ांची तोडफोड करण्यात आली आहे. तर वाहतूक बंद असल्याने गेल्या तीन दिवसांचा विचार करता महामंडळाचे 8 कोटी रूपयांचे उत्पन्न बुडाले आहे. नगर, जालना, संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव या जिह्यातील एसटीची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे.

पाली, पनवेल, शहापूर, अलिबागमध्ये मोर्चा

आज पाली, पनवेल, शहापूर व अलिबागमध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चा काढला. पाली तहसील कार्यालयावर काढलेल्या मोर्चात शेकडो तरुण सहभागी झाले होते. पनवेलमधील महात्मा फुले कॉलेजच्या आवारात निषेध करण्यात आला. शहापूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढल्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार कोमल ठाकूर यांना दिले. अलिबागमध्येही जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गगनभेदी घोषणा दिल्या. दरम्यान महाड व पोलादपूरमध्ये उद्या मंगळवारी बंदची हाक देण्यात आली आहे.

सातारा जिह्यात रास्ता रोको, चक्का जाम

 सातारा शहरासह जिह्यातील कराड, पाटण, खटाव, माण, फलटण, कोरेगाव तालुक्यात जनतेने उत्स्फूर्त बंद पाळून राज्य सरकारचा धिक्कार केला. वडूज, दहिवडीत सरकारविरोधात मोर्चे काढले गेले, तर फलटणमध्ये नाना पाटील चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सातारा, कराड, पाटण, खटाव, माण, औंध, फलटण, कोरेगाव, खंडाळा तसेच जावली तालुक्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला.

कुर्ल्यात सरकारविरोधात संताप

शिवसेना विभाग क्रमांक 6 कुर्ला आणि कालिना विधानसभेचे विभागप्रमुख डॉ. महेश पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली जालना येथील मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर जुलमी राज्य सरकारने केलेल्या भीषण लाठीमार व गोळीबाराचा निषेध करून सुभाष शहा चौक, नेहरूनगर, कुर्ला पूर्व येथे सोमवारी तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला विभाग संघटक संजना मुणगेकर, विधानसभा संघटक दिलीप शिंदे, महिला विधानसभा संघटक हर्षदा परब, मीना बनसोडे, उपविभागप्रमुख बळीराम घाग, संदीप गावडे, युवासेना सहसचिव अमित रामचंदानी यांच्यासह सर्व आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, शाखाप्रमुख आणि शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.