भरलाय सरकारच्या पापाचा घडा… दादा सत्तेतून बाहेर पडा! घोषणांनी बारामती दणाणली

‘एक मराठा – लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’, ‘भरलाय सरकारच्या पापाचा घडा… दादा सत्तेतून बाहेर पडा!’,  अशा जोरदार घोषणांनी बारामती दणाणून गेली होती. शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला.

सरकारविरोधात बारामतीतील मराठा समाज बांधवांनी विराट मोर्चा काढला. कसबा येथील छत्रपती श्री शिवाजी उद्यान येथून मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चाची भिगवण चौकात सांगता सभा झाली. या वेळी मराठा सामाज बांधवांनी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी येत असलेल्या तांत्रिक अडचणी व राज्यातील मराठा समाजाच्या बहुसंख्य खासदार, आमदार तसेच सत्तेत येणारे सर्वच पक्ष मराठा समजाला आरक्षण द्यायचे आहे हे विसरतात, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.