‘नरेंद्र मोदींची आणखी किती खुशामत करणार?’ तृणमूलच्या खासदाराचा उपराष्ट्रपतींना सवाल

संसदेच्या परिसरात मिमिक्रीनं राजकीय वादळ उठवल्यानंतर काही दिवसांनी, तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी म्हटले आहे की जर एखाद्याला ‘विनोद समजत नसेल’ आणि मिमिक्रीचं कौतुक करण्यासाठी ‘सुसंस्कृत मन’ नसेल तर मी ‘असहाय्य’ (काही करू शकत नाही) आहे.

बॅनर्जी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या सेरामपूर येथे एका राजकीय सभेला ते संबोधित करत होते. बॅनर्जी म्हणाले की, लोकसभेत मिमिक्री करणारे पहिले व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. त्यानंतर मंचावर असताना त्यांनी पंतप्रधानांची नक्कल केली. ‘त्यांनी नक्कल केली, आम्ही हसलो. आम्ही आक्षेप घेतला नाही’.

मिमिक्री ही एक कला आहे, असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. ‘जर कोणाला कलेची समज नसेल, तर मी काय करू? जर कोणाला विनोद समजत नसेल, कोणाकडे सुसंस्कृत मन नसेल, तर मी असहाय आहे’, असं त्यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं नाव न घेता म्हटलं.

धनखड यांनी तृणमूल खासदाराकडून करण्यात आलेल्या मिमिकरीला ‘लज्जास्पद’ कृती म्हटलं. या मिमिकरीने वेदना झाल्या आणि जाट समाजातील शेतकर्‍यांचा मुलगा म्हणून त्यांचा अपमान झाला असा आरोप करण्यात आला. बॅनर्जी यांच्या नकलेचे चित्रीकरण केल्याबद्दल त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली होती.

शेतकऱ्याचा मुलगा म्हणून अपमानित झाल्याच्या उपराष्ट्रपतींच्या टीकेवर प्रत्युत्तर देत तृणमूलच्या खासदाराने त्यांना किती दिवस शेतात काम केले हे देशातील जनतेला विचारण्याचे धाडस केले. ते म्हणाले, ‘देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांनी त्यांच्याइतकी संपत्ती कमवावी, अशी मी प्रार्थना करतो’.

‘तुम्ही शेतकऱ्यांचा मुलगा आहात असे म्हणता. तुम्ही 20 लाख रुपयांचा सूट घालता. अनेक हिंदुस्थानी शेतकऱ्यांना या हिवाळ्यात एक ब्लँकेटही परवडत नाही. त्यामुळे अशा स्थितीत आल्यानंतर तुम्ही त्यांच्या घरी किती लाख ब्लँकेट पाठवलेत? कृपया लोकांना सांगा’, असं ते म्हणाले.

‘तुम्ही शेतकऱ्यांचा मुलगा आहात असे म्हणता. मग सांगा, वकील म्हणून तुमच्या कारकिर्दीत तुम्ही कितीवेळा शेतकऱ्यांसाठी खटला लढवला? मी केला आहे. मी 40 वर्षे गरिबांसाठी खटले लढले आहेत’, असं ते म्हणाले.

भाजप खासदार आणि माजी कुस्ती बॉस ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षी मल्लिक यांना उपराष्ट्रपतींनी समर्थन का दिलं नाही, असा सवालही बॅनर्जी यांनी केला.

उपराष्ट्रपतींवर पंतप्रधानांची खुशामत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत बॅनर्जी म्हणाले, ‘तुम्ही विरोधकांचा आवाज दाबता आणि मग तुम्ही नरेंद्र मोदी हे या शतकातील ‘महापुरुष’ म्हणता. तुम्ही त्यांची किती खुशामत करता हे स्पष्ट होते’.

बॅनर्जी यांनी निलंबनाच्या विरोधात संसदेच्या आवारात विरोधकांच्या खासदारांच्या निषेधादरम्यान मिमिक्री केली होती, एकूण 146 विरोधी खासदारांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या निवेदनाची मागणी केल्यानंतर ‘गैरवर्तन’ केल्याबद्दल दोन्ही सभागृहातून निलंबित करण्यात आलं आहे.

भाजपनं खासदारावर जोरदार टीका केली आणि उपराष्ट्रपतींची नक्कल करण्याचे कृत्य अनादर करणारे आहे म्हटलं आहे.