मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील ‘शापित दालन’ घेण्यास मंत्री तयार होईनात

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊन मंत्रीपदाची शपथ घेतलेले अजित पवार आणि त्यांच्या सोबतच्या नव्या मंत्र्यांनी मंत्रालयातील रिकाम्या मंत्री दालनाचा शोध सुरू केला आहे. अजित पवार हे सहाव्या मजल्यावरील दालनासाठी आग्रही आहेत. पण याच मजल्यावर ‘शापित’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 602 क्रमांकाच्या दालनात कोणीही नवीन मंत्री जाण्यास तयार होत नसल्याची माहिती आहे.

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दालन आहे. त्यांच्या शेजारीच असलेल्या दोन अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये फेरफार करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दालन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तर पाचव्या मजल्यावरील रिकाम्या दालनासाठी हसन मुश्रीफ यांनी चाचपणी सुरू केली आहे.

यापूर्वी दक्षिणेच्या पायऱ्या तोडल्या होत्या

मंत्रालयाच्या दर्शनी भागात असलेल्या पायऱ्या यापूर्वी तोडल्या होत्या. या पायऱ्या दक्षिण दिशेकडे होत्या. दक्षिण दिशेकडून मंत्रालयात शिरणाऱ्या या पायऱ्यांवरून प्रवेश केला तर राजकीय प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होते. या समजुतीमुळे मंत्रालयाच्या दक्षिण दिशेकडील या पायऱ्यांचा कधीही वापर कोणीही केला नाही. त्यामुळे मंत्रालयाच्या दक्षिणेकडील या पायऱ्या मध्यंतरी जेसीबी लावून तोडण्यात आल्या होत्या.

602 दालन ‘फळत’ नाही

602 क्रमांकाचे दालन तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना हे दालन दिले होते. पण पुढे ते एकनाथ खडसेंना भूखंड घोटाळ्यावरून राजीनामा द्यावा लागला होता. नंतर कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांना हे केबिन दिले पण त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. पुढे तत्कालीन कृषी मंत्री अनिल बोंडे यांना हेच दालन देण्यात आले पण अनिल बोंडे यांचा निवडणुकीत पराभव झाला.