विक्रोळी टागोरनगरमध्ये उभा राहिला सुसज्ज तरणतलाव

विक्रोळीत बऱयाच वर्षांपासून शिवसेनेकडून सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे टागोरनगरमध्ये सुसज्ज असा तरणतलाव उभा राहिला. या तरणतलावाचे लोकार्पण विक्रोळी मतदारसंघाचे आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. त्यामुळे परिसरातील विविध वयोगटातील मुले, तरुण, तरुणी, महिला यांना त्याचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान, यावेळी सोलर ऊर्जा प्रकल्प, मलनिःसारण प्रकल्प, महात्मा फुले रुग्णालयाच्या पुनर्विकास प्रकल्पांचे भूमिपूजनही आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते झाले.

विक्रोळी विधानसभा मतदारसंघात विकासकामे आणि नागरी सेवासुविधा देण्यासाठी झटणारे शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते गेल्या शुक्रवारी विभागातील विविध नागरी विकास आणि सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1996 मध्ये कन्नमवारनगर येथे लोकार्पण केलेल्या महात्मा फुले रुग्णालयाच्या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन सुनील राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपनेते दत्ता दळवी, महिला विभाग संघटिका राजेश्वरी रेडकर, विधानसभाप्रमुख परम यादव, उपविभागप्रमुख शेखर जाधव, उपविभाग संघटिका रश्मी पहुडकर, विधानसभा संघटक शंकर ढमाले, वंदना बेंद्रे, शाखाप्रमुख अभय राणे, प्रकाश पुजारी, दीपक सावंत, आनंद पाताडे उपस्थित होते.

झोपडय़ांना सोलर ऊर्जेचा आधार

विभागातील झोपडय़ांना योग्य तो वीजपुरवठा व्हावा यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ सुनील राऊत यांच्या हस्ते झाला. सौर ऊर्जेमुळे पाण्याचे पंप, हाऊस गल्लीतील दिवे तसेच घरातील वीज उपलब्ध होणार आहे. भविष्यात या प्रकल्पातून हनुमाननगर, संत ज्ञानेश्वरनगर, जय भीम, इंदिरा निकास, शिवछाया, भीमछायामधील झोपडय़ा आणि चाळींना वीजपुरवठा होणार आहे.

173 कोटींचा प्रकल्प

कन्नमवारनगर आणि टागोरनगर-2 मधील रहिवाशांना दिलासा देणाऱया मलनिःसारण प्रकल्पाचे उद्घाटनही सुनील राऊत यांच्या हस्ते झाले. हा प्रकल्प 173 कोटींचा आहे. यामुळे या परिसरातील मलनिःसारणाचे पाणी भांडुप जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत वाहून नेले जाणार आहे.