फडणवीस, गृह मंत्रीपदाचा राजीनामा द्या! मुंबईत डबेवाला संघटना आक्रमक

वारकरी आणि मराठा समाजावर लाठीमार करणाऱ्या राज्य सरकारचा तीव्र शब्दांत धिक्कार करतानाच देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मुंबईतील डबेवाला संघटनेने केली आहे.

  जालन्यातील लाठीमाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी दादर येथे मराठा समाजाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलनात मुंबईतील डबेवालेही सहभागी झाले होते. सरकार आणि पोलिसांचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला. या घटनेची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री फडणवीस जोपर्यंत राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याचा इशारा यावेळी डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिला.

  डबेवाला म्हणून आम्ही मुंबईत काम करत असलो तरी आम्ही मावळ भागातून आलेलो आहोत. त्यामुळे आम्ही मावळे आहोत, आम्ही मराठा आहोत. आरक्षणाची गरजही आम्हाला आहे. आमच्या आजोबांनी, वडिलांनीही डबेवाले म्हणूनच काम केले होते. आता आमच्या मुलांनी डबे वाहू नयेत, असे आम्हाला वाटते. आरक्षण मिळाले तर आमची मुले शिकतील. त्यांनाही नोकऱ्या मिळतील. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही मुंबईच्या डबेवाल्यांचीही मागणी आहे, असे तळेकर यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.