कोर्टात नाट्यमय घडामोडी, न्यायमूर्ती रोहित देव यांचा भर कोर्टरूममध्ये राजीनामा

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी शुक्रवारी सकाळी भर कोर्टातच अचानक राजीनामा जाहीर केला. आत्मसन्मानाच्या विरुद्ध जाऊन काम करणे मला शक्य नाही, असे सांगून न्या. देव यांनी राजीनाम्याची घोषणा केल्याने सर्वांनाच धक्का बसला. त्यांच्या राजीनाम्याबाबत अनेक तर्कविर्तक लावले जात आहेत.

विशेष म्हणजे अलाहाबाद उच्च न्यायालयात त्यांची बदली करण्यात आली होती. गुरुवारी या बदलीचे आदेश मिळाले आणि शुक्रवारी सकाळी न्या. देव यांनी राजीनामा दिला. नक्षलवादाच्या आरोपावरून गडचिरोली सत्र न्यायालयाने जी.एल. साईबाबा यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. ही शिक्षा रद्द करून न्या. देव यांनी साईबाबा यांची निर्दोष सुटका केली होती. समृद्धी महामार्गाचे काम करणाऱया पंत्राटदारांना गौण खनिज शुल्कात माफी देण्याचा राज्य शासनाचा निर्णयही न्या. देव यांनी अवैध ठरवत रद्द केला.

या दोन प्रकरणांमुळे न्या. देव हे चर्चेत आले होते. या दोन प्रकरणांचा संदर्भ न्या. देव यांच्या राजीनाम्याशी जोडला जात आहे. तर व्यक्तिगत संबंध असलेल्या वकिलांच्या व व्यक्तींच्या प्रकरणांवर न्यायमूर्ती कधीच सुनावणी घेत नाहीत. मात्र अशा काही प्रकरणांवर न्या. देव यांनी सुनावणी घेतली होती. याची तक्रार सर्वोच्च न्यायालयाला करण्यात आली होती. त्यामुळेच त्यांची अलाहाबाद न्यायालयात बदली झाल्याचीही चर्चा होती.

4 डिसेंबर 2025 रोजी संपणार होता कार्यकाळ

न्या. देव यांची 5 जून 2017 रोजी अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दोन वर्षांच्या कालवधीनंतर त्यांना न्यायमूर्ती पदी कायम करण्यात आले. 4 डिसेंबर 2025 रोजी त्यांचा कार्यकाळ संपणार होता. न्यायमूर्ती होण्याआधी देव यांनी महाधिवक्ता म्हणूनही काम केले आहे.

न्या. देव यांचे भावनिक निवेदन

प्रकरणे हाताळताना मी तुम्हाला कधी रागावलो असेन तर ते न्यायव्यवस्थेच्या भल्यासाठीच. ही व्यवस्था आणखी बळकट व्हावी हाच त्यामागे हेतू होता. मला कोणालाही दुखवायचे नव्हते. तरीही तुम्ही दुखावले गेले असाल तर मी माफी मागतो. मी आज राजीनामा देत आहे. आत्मसन्मानाच्या विरुद्ध जाऊन काम करणे मला शक्य नाही, असे न्या. देव यांनी भर कोर्टात सांगितले. सकाळी कामकाज सुरू होताच न्या. देव यांनी न्यायालयात उपस्थित असलेले वकील व पक्षकारांसमोर हे निवेदन केले.