नांदेड जिल्ह्यात कडकडीत बंद, तत्काळ आरक्षण देण्याची मागणी

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी नांदेड शहर आणि जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. ठिकठिकाणी मोर्चे, निदर्शने करुन सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लाठीमाराचा निषेध करुन मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्याची मागणी केली.

नांदेड शहरात आज सकाळी 1 1 वाजता राज कॉर्नर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने विविध संघटना व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते एकत्र जमले. तेथून पायी चालत घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेला. आंदोलकांवर गोळीबार करणार्‍या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध असो, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, जय भवानी जय शिवाजी आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. हळूहळू मोर्चात गर्दी जमा होऊ लागली. आयटीआय चौक, शिवाजीनगर, कलामंदिर, वजिराबाद, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा नेण्यात आला. सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. मराठा समाजाला तात्काळ आरक्षण मिळाले पाहिजे, आंदोलकांवर झालेल्या गोळीबाराचा निषेध तसेच याची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सकल मराठा समाजाचे तसेच विविध संघटनांचे, पक्षाचे पदाधिकारी सामील झाले होते. काही ठिकाणी तुरळक दगडफेक झाली, मात्र पोलीस बंदोबस्त तगडा असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार व त्यांच्या सहकार्‍यांनी शहरातील प्रत्येक चौकात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

कुंडलवाडी-अंतरवाली घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने आज 4 सप्टेंबर रोजी कुंडलवाडी शहरातील बाजारपेठ बंदची हाक देण्यात आली होती. या बंदमध्ये शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मौजे अंतरवाली ता.अंबड जि.जालना येथे जे शांततेच्या मार्गाने उपोषण चालु आहे.ते उपोषण हाणुन पाडण्यासाठी उपोषण समर्थक मराठा समाज बांधवावर पोलीसांनी अमानुषपणे लाठीमार व गोळीबार करण्यात आला. या घटनेत अनेकांना गंभीर दुखापत झाली. या घटनेच्या निषेधार्थ आज दि. 4 सप्टेंबर सोमवार रोजी कुंडलवाडी शहरातील बाजारपेठ सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने बंद ठेऊन त्या घटनेचा निषेध करण्यात आला. या बंदमध्ये सर्व व्यापार्‍यांनी आपापली दुकाने बंद ठेवून बदला 1 00 टक्के प्रतिसाद दिला. बसस्थानक जवळील शिवाजी चौकातुन डॉ. हेडगेवार चौक व मुख्य बाजारपेठेत घोषणाबाजी करून निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे व सहकारी कर्मचार्‍यांचे पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

अर्धापूर- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अर्धापूरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळा जाळून राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत महाविकास आघाडीच्या वतीने दि.4 सोमवारी रोजी आंदोलन करण्यात आले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने अर्धापूर तालुक्यातील भोकर फाटा, मालेगाव, कामठा येथील दुकाने बंद करून रस्त्याने राज्य सरकार विरुद्ध घोषणाबाजी करण्यात येऊन तहसीलदार मार्फत निवेदन देऊन मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजीराव गव्हाणे, युवक काँग्रेसचे पप्पू कोंढेकर, संचालक निळकंठराव मदने, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष उद्धवराव राजेगोरे, शहराध्यक्ष राजेश्वर शेटे, नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, माजी नगराध्यक्ष नासेर खान पठाण, उपनगराध्यक्ष प्रतिनिधी मुस्वीर खतीब, चेअरमन प्रविण देशमुख, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष पप्पू पाटील टेकाळे, तालुकाप्रमुख संतोष कल्याणकर, उपसभापती अशोक कपाटे, उपतालुका प्रमुख अशोक डांगे, संतोष कदम, उपशहर प्रमुख शिवप्रसाद दाळपुसे, गजानन गव्हाणे, सरपंच दत्ता नवले, राजू कल्याणकर, उमेश सरोदे, शिवसेनेचे शहरप्रमुख काजी सल्लावोद्दीन, शेतकरी सेना तालुकाप्रमुख रमेश क्षीरसागर, शेख रफिक, नगरसेवक सलिम कुरेशी, सोनाजी सरोदे, डॉ.आनंद शिंदे, बळीराम पाटील हट्टेकर पांगरीकर, बबनराव लोखंडे, बाळू माटे, व्यंकटी राऊत, बाबाराव सरोदे, वसंतराव कल्याणकर, मनोज कदम, राजाराम पाटील पवार, सोशल तालुकाध्यक्ष गुणवंत सरोदे, संतोष कपाटे, बाबूराव जाधव, रमेश क्षीरसागर, विशाल नरवाडे,सचिन बुटले.

धर्माबाद-जालना जिल्ह्यातील अंतरावरील सराटी येथील घटनेच्या निषेधार्थ व मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी निषेध मोर्चा व पुकारण्यात आलेल्या बंदच्या हाकेला धर्माबाद शहरात मोठा प्रतिसाद मिळाला अाहे. शहरातील व्यापारी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली तर शैक्षणिक संस्थांनी शाळा, महाविद्यालय बंद ठेवून बंदमध्ये उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. दिनांक 1 सप्टेंबर रोजी जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथील उपोषणकर्ते मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाच्या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेच्या निषेधार्थ 2 सप्टेंबर 2023 रोजी धर्माबाद शहर बंदचे निवेदन पोलीस प्रशासनाला देण्यात आले होते. या हाकेला धर्माबाद शहरातील व्यापारी बांधवांनी आज आपली दुकाने प्रतिष्ठाने बंद करून पाठिंबा दर्शविला तसेच शैक्षणिक संस्थेतही बंद पाळण्यात आला. यावेळी धर्माबाद बसस्थानकात तसेच रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. एसटी महामंडळाकडून खबरदारी म्हणून सकाळासूनच सर्वच बसेस बंद करण्यात आल्या व तशी प्रवाशांना एसटी महामंडळाकडून सूचनाही देण्यात आली होती. बंद काळात कुठलाही अनुसूचित प्रकार घडला नाही.

आष्टी-जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणार्‍या मराठा कार्यकर्त्यावर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यावरून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. मराठा आरक्षण व अंतरवाली सराटी घटनेचा निषेध म्हणून सोमवारी पुकारण्यात आलेल्या बंदला तामसा बाजार येथे संमिश्र प्रतिसाद मिळाला असून, संपूर्ण व्यापारपेठ बंद ठेवण्यात आल्याने रस्त्यावर शुकशुकाट पसरलेला होता. या बंद दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तामसा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पुंजाजी दळवी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

बिलोली-मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या प्रलंबित मागणीसाठी अंतरवाली सराटी ता. अंबड जि. जालना येथे शांततेच्या मार्गाने जे उपोषण चालु होते त्या उपोषणस्थळी पोलीसानी मराठा समाज बांधवांवर अमानुषणे केलेल्या लाठी हल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले. या घटनेचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे. याचे पडसाद बिलोली तालुक्यात देखील पडले असून दि.4 सप्टेंबर रोजी बिलोली कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला व्यापारी प्रतिष्ठाने यांनी आपली दुकाने बंद ठेवून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या घटनेचा जाहीर निषेध म्हणून तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने बिलोली बंदची हाक देण्यात आली होती. त्याअनुषंगाने दि.4 सप्टेंबर सोमवार रोजी या बंदला शहरासह परिसरातील व कुंडलवाडी, कासराळी, सगरोळी यासह अन्य गावातील व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद ठेवून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. सकल मराठा समाजाच्या शेकडोंच्या संख्येने आलेल्या समाज बांधवांनी या घटनेच्या निषेधार्थ जुना बसस्थानक परिसरात टायर जाळुन सत्ताधारी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी देत जाहीर निषेध व्यक्त केला.

नायगांवबाजार-जालना येथील मराठा मोर्चावर केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने या सरकारच करायच काय खाली मुंडक वरी पाय, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा गगनभेदी घोषना देत नायगांव कडकडीत बंद ठेवत आले. शिवसेनेनेही पांठीबा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची डीएनए चाचणी करा, अशी मागणी छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रताप सोमठानकर यांनी निषेध सभेत केली. अनेकांनी या सरकारवर जोरदार टिका करत येणार्‍या काळात सकल मराठा समाज काय आहे दाखवण्याची वेळ आल्यचे अनेकांनी या सरकारला इशारा दिला. जालना येथील घटनेचे महाराष्ट्रासह ग्रामीण भागातही तीव्र पडसाद उमटले आहेत. लोकशाही पद्धतीने न्याय मागणार्‍या मोर्चेकर्‍यांवर अमानूषपणे लाठी हल्ला करून महिलांना गंभीर जखमी करून आंदोलन मोडीत काढणार्‍या पोलीस आणि राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेध करत नायगांव तालुक्यात विविध ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापार्‍यांनी आपले प्रतिष्ठाने बंद ठेवत या बंदमध्ये सहभाग नोंदवला.

नायगांव शहरातील शिवाजी चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने या घटनेचा निषेध करत निवेदन देण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष विजय चव्हाण, श्रीनिवास चव्हाण, प्रा.रविंद्र चव्हाण, प्रताप सोमठाणकर, प्रा.डॉ. जीवन चव्हाण, राजेश लंगडापुरे, डॉ. शंकर गडमवार, बंटी शिदे, रंजित देशमुख, पंढरीनाथ भालेराव, माणिक चव्हाण, रंजित देशमुख, नगरसेवक शिवाजी कल्याण, संजय चव्हाण, पांडुरंग चव्हाण, चंद्रकांत पवार, गजानन पवार, हाणमंत शिदे आदीची उपस्थिती होती. नायगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओंमकार चिंचोळकर यांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.

नरसीफाटा-जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण प्रश्नी उपोषण करणार्‍या आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने नरसी येथे सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. नांदेड जिल्ह्यातील प्रमुख मध्यवर्ती चौरस्ता असलेल्या नरसीत बंदला शतप्रतिशत उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. या बंद दरम्यान नरसी चौरस्त्याच्या चारही मार्गावरील सर्व बाजारपेठ पुर्णपणे बंद असल्याने व्यवहार ठप्प होते. संतप्त जनभावना लक्षात घेता वाहतुक सेवा देखील तुरळक प्रमाणात होती. नरसी चौकात सर्वत्र कडकडीत बंदचे दृश्य होते. एकूणच सकल मराठा समाजाने पुकारलेला नरसी बंद शंभर टक्के यशस्वी झाला.

येथून जवळच असलेल्या शंकरनगर येथे देखील सकल मराठा समाजाने सोमवारी बंदचे आवाहन केले होते. या बंदला शतप्रतिशत पाठिंबा मिळाला. यावेळी शंकरनगर येथील संपुर्ण बाजारपेठ कडकडीत बंद होती. अमानुष लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत प्रमुख पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत यावेळी प्रशासनास निवेदन देण्यात आले. सकल मराठा समाजाच्या या बंदला विविध राजकीय पक्ष व संघटनांनी देखील जाहीर पाठिंबा दिला होता. नरसी, शंकरनगर यासह परिसरातील अनेक प्रमुख गावात देखील बाजारपेठा बंद ठेवून शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.बंद शांततेत व्हावा यासाठी पोलीसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता. मुखेड-मागील आठवड्यात जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या सबंध राज्यात निषेध व्यक्त केला जात आहे. याच अनुषंगाने मुखेड शहरात सकल मराठा समाज बांधव व सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी या आंदोलनात आपला सहभाग नोंदवून रस्तारोको आंदोलन केले.

या अनुषंगाने 4 सप्टेंबर रोजी मुखेड शहरात रस्तारोको आंदोलन करण्याचा इशारा सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने प्रशासनाला या अगोदरच देण्यात आला होता. आज सकाळी दहा वाजेपर्यंत सर्वच मार्ग सुरू होते. यानंतर सकाळी अकराच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मंडप टाकून सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने रास्तारोको आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी आरक्षणाच्या घोषणाही देण्यात आल्या. या आंदोलनात विरोधी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते सामील झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून आंदोलनात सुरुवात करण्यात आले. दोन ते तीन तास रास्ता रोको केल्यानंतर सदर आंदोलन थांबविण्यात आले व वाहतूक पूर्ववत सुरू झाली. यावेळी पोलीस निरीक्षक रमेश वाघ यांनी कडक पोलीस बंदोबस्त लावला होता.

मुदखेड-जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथील सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सनदशीर मार्गाने समाज बांधव उपोषण व आंदोलन करीत असताना त्यांच्यावर अचानकपणे पोलिसांकडून जो लाठीr हल्ला करण्यात आला. त्या घटनेचा तीव्र शब्दात मुदखेड शहर व बारड सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने निषेध करत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. बारड येथील बाळासाहेब देशमुख बारडकर यांच्या नेतृत्वाखाली बारड येथे रस्तारोको करत शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले.

श्रीक्षेत्र माहूर-जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ माहूर तालुक्यातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणार्‍या वाईबाजार येथे दि. 4 सप्टेंबर रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला असून या बंदला येथील व्यापार्‍यांनी आपला पाठिंबा दर्शविला. माहूर शहर दि.2 रोजीच बंद ठेवले होते. त्यामुळे शहरातील बाजारपेठ सुरु होती. मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षापासून मागणी होत असून मराठा समाजाने शांततेने विराट मोर्चे काढले असून, कुठेही गालबोट लागु दिले नाही. मात्र यावेळी 1 सप्टेंबर 23 रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात काही दिवसापासून उपोषण सुरू असतांना त्या उपोषणकर्त्यावर पोलिसांकडून अमानुष लाठी हल्ला करण्यात आला. त्याच्या निषेधार्थ आज वाईबाजारमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. त्या बंदला व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल रुणवाल यांनी पाठिंबा दिला असून, सायंकाळी सहा वाजेपर्यंत बाजारपेठ पुर्णतः बंद राहील, असे आवाहन केले होते. त्या आव्हानाला येथील व्यापार्‍यांनी पाठिंबा देत पूर्ण बंद पाळला. येथील छत्रपती शिवाजी स्मारकाजवळ मराठा आरक्षण समिती कडून जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा, देवेंद्र फडणवीसच कराच काय, खाली मूंडक वर पाय अशा अनेक घोषणा देत निषेध करण्यात आला.

हदगाव-जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या सहा दिवसापासून शांततेच्या मार्गाने आमरण उपोषण चालू आहे. परंतु दिनांक 1 सप्टेंबर रोजी जालना पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज गोळीबार व अश्रुधुरांच्या नळकांड्या सोडत हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. याचे दिनांक 2 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र प्रडसाद उमटले. या हल्ल्याच्या निषेधार्थ हदगाव तालुक्यातील विविध संघटना व सकल मराठा बांधवांच्या वतीने सोमवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी संपूर्ण हदगाव तालुका बंदची हाक दिली होती. सकल मराठा समाजाच्या बंदच्या हाकेला हदगाव शहरासह तालुक्यातील निवघा-तळणी, मनाठा, बामणी फाटा, तामशा येथिल व्यापार्‍यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून भरभरून प्रतिसाद दिला.

सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व शिंदे व फडवणीस सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत शहरात शांततेत पायी रॅली काढली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगन्नाथ पवार यांनी शहरात महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवून आपल्या वाहनातून गस्त घालत आंदोलकांना व नागरिकांना शांततेचे आवाहन केले. एकंदरीत सकल मराठा बांधवांचा एकदिवसीय बंद शांततेत पार पडला.

किनवट-जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आंदोलकावर झालेल्या अमानुष लाटीचार्जच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने किनवट येथील जिजामाता चौकात आंदोलन करण्यात आले असून, व्यापार्‍यांनी स्वयंस्फुर्तीने कडकडीत बंद पाळला. आंदोलना दरम्यान समाधान उटकर या तरुणाने स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकुन जाळून घेण्याचा प्रयत्न केला असता उपस्थित पोलीस व समाज बांधवांनी प्रसंगावधान राखून तरुणाला रोखल्याने अनर्थ टळला.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे दि. 1 सप्टेंबर 2023 रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन सुरू असताना पोलीस प्रशासनाने आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने वयोवृद्ध महिला व पुरुष गंभीर जखमी झाले. पोलीस प्रशासनाने दडपशाही करून मराठा समाजाचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे तीव्र पडसाद आज किनवट तालुक्यात उमटले असून, सकल मराठा समाजाने येथील जिजामाता चौकात आंदोलन करत निषेध केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे करायचे काय? खाली मुंडकं वरती पाय! आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे! राज्य सरकार मुर्दाबाद! अशी जोरदार घोषणाबाजी केली व विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. आंदोलकावर दाखल केलेले 307 सारखे खाेटे गुन्हे मागे घ्यावेत, घटनेस जबाबदार असलेले राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा तसेच या घटनेत लाठीचार्ज करणार्‍या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना तात्काळ निलंबित करावे, अशा मागण्या निवेदनातून केल्या आहेत. या दरम्यान जिजामाता चौक येथे आंदोलन सुरू असताना एका आंदोलकाने रॉकेल अंगावर ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु उपस्थित असलेले समाज बांधव व पोलिसांनी त्याला वेळीच रोखल्याने अनर्थ टळला. आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर व्यापार्‍यांनी स्वयंस्फुर्तीने कडकडीत बंद पाळला. या आंदोलनाला विविध पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी तसेच बंजारा, दलित, आदिवासी व मुस्लिम समाजाने जाहीर पाठिंबा दिला तर आमदार भीमराव केराम हे स्वतः उपस्थित राहुन आंदोलनात सहभागी झाले होते.

उपविभागीय पोलीस अधिकारी आर. एन.मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. भोकर-मराठा आंदोलकावर पोलीसाकडून झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा भोकर तालुका शिवसेनेतर्फे तीव्र निषेध करण्यात येवून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी घेऊन पदाचा राजीनामा देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हिमायतनगर-जालना घटनेच्या निषेधार्थ आज दि. 4 सप्टेंबर रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने हिमायतनगर बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला शहरातील सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा देत चांगला प्रतिसाद मिळाला. या बंद दरम्यान सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातील श्री परमेश्वर मंदिरासमोर सर्व मराठा समाज बांधवांची एक बैठक घेऊन हा मोर्चा काढण्यात आला होता. शहरातली श्री परमेश्वर मंदिर येथून हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर शहरातील बाजार चौक ते चौपाटी परिसरातील सर्व व्यापार्‍यांना बंदचे आव्हान करत एक मराठा लाख मराठा चे नारे देत तहसील कार्यालय येथे धडकला. हा मोर्चा शांततेत पार पडला. या मोर्चात सकल मराठा समाज मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी येथील पोलीस निरीक्षक भुसनुर यांनी शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.