थाप मारून थापाड्या गेला! नांदेड, परभणीत मोदींच्या थापसभा!

नांदेड आणि परभणीत झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत थापांची बरसात झाली. पंतप्रधान मराठवाड्यासंदर्भात काहीतरी बोलतील, अशी अपेक्षा ठेवून आलेल्या लोकांच्या पदरी थापाच पडल्या. काँग्रेसमुळेच मराठवाडा मागास राहिला, असे खापर फोडून थापाड्या गेला, अशीच प्रतिक्रिया मोदींच्या सभेनंतर उमटली.

नांदेड लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर तसेच परभणी लोकसभा मतदारसंघातील रासपचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. रणरणत्या उन्हात झालेल्या या सभेला आलेल्या लोकांना मोदी मराठवाड्याबद्दल काही बोलतील, अशी अपेक्षा होती. परंतु, नांदेड येथील सभेत मोदींनी शंकरराव चव्हाण यांची स्तुती केली. आदर्श घोटाळ्यावरून गेल्या निवडणुकीत ‘डीलर’ अशी पदवी दिलेल्या अशोक चव्हाण यांचे गुणगान गायले. अशोक चव्हाणांकडे कटाक्ष टाकत ‘ज्यांच्यात निवडून येण्याची क्षमता नसते, ते मागच्या दाराने राज्यसभेवर जातात’ अशी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर टीकाही केली.

परभणी येथील सभेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अक्षरश: थापांची बरसात केली. परभणीतील 40 हजार लोकांना पक्की घरे दिली, घरकुलांना पाणीपुरवठा दिला, बारा लाख लोकांना दर महिन्याला रेशन फुकट देतोय, मराठवाड्याचा विकास काँग्रेसवाल्यांमुळेच खुंटला अशा अनेक थापा मोदी यांनी मारल्या. गेल्या निवडणुकीतील विकसित भारत, आत्मनिर्भर भारत या थापांचाही त्यांनी पुनरुच्चार केला. 2019च्या निवडणुकीनंतर अतिरेकी हल्ल्यांची चर्चा थांबली आणि सर्जिकल स्ट्राइकची चर्चा सुरू झाली. कोणत्याही जातीपातीचा, धर्माचा विचार न करता सरकारने प्रत्येकापर्यंत विकास पोहोचवला, असा दावाही त्यांनी केला. भाजप तिसर्‍यांदा सत्तेत आल्यास राहिलेली सर्व कामे पूर्ण करणार आणि परभणीला विकसित जिल्हा अशी ओळख मिळवून देणार, अशी लोणकढी थापही त्यांनी मारली.

महादेव जानकर माझे लहान भाऊ
परभणीतील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर हे माझे लहान भाऊ आहेत. सर्वसामान्य मतदारांनी जानकर यांच्या पाठीशी ताकद उभी करावी, त्या मोबदल्यात आपण परभणीचा विकास करू, अशीही थाप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवटी हाणली.