माझ्या वडिलांनी मेहनतीने नाव कमावलं होतं, ते मातीत मिसळू नका, नितीन देसाई यांच्या मुलीचे भावनिक आवाहन

प्रख्यात कलादिग्दर्शक आणि एन.डी. स्टुडिओचे सर्वेसर्वा नितीन देसाई यांनी मंगळवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर त्यांची पत्नी नेहा देसाई यांनी ईसीएल फायनान्स, एडलवाइझ कंपनीचे केयूर मेहता, रशेष शहा, स्मित शहा, ईएआरसी कंपनीचे आर. के. बन्सल आणि इन्सॉल्वन्सी अधिकारी जितेंद्र कोठारी यांच्या विरोधात मानसिक छळवणूक केल्याचा आरोप केला. त्यानंतर या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान शनिवारी नितीन देसाई यांची मुलगी मानसी देसाईने प्रसारमाध्यमांसमोर येत त्यांची बाजू मांडली आहे. तसेच माझ्या वडिलांना कुणालाच फसवायचे नव्हते. त्यांनी खूप मेहनतीने हे नाव कमावलं आहे त्यामुळे त्यांचे मातीत मिसळू नका, असे आवाहन देखील मानसीने केले आहे.

”माझे बाबा नितीन चंद्रकांत देसाई 2ऑगस्ट 2023 रोजी आम्हाला सोडून गेले. त्यानंतर त्यांच्याबाबत काही चुकीची माहिती पसरवली जात आहेत. त्यांनी त्या कंपन्यांचे कर्ज बुडवल्याच्या बातम्या येत आहेत. माझ्या वडिलांवर 181 कोटी रुपयांचं कर्ज होतं, त्यापैकी 86.3 कोटी रुपयांची परतफेड आम्ही फेब्रुवारी 2020 पर्यंत केली होती. नंतर कोरोनाचा बॉलीवूडला फटका बसला. बाबाकडे काम नव्हतं म्हणून स्टुडिओ बंद करावा लागला, त्यामुळे पेमेंट्स देण्यात उशीर झाला, नियमित होऊ शकले नाहीत. त्याआधी लोन देणाऱ्या कंपनीने आमच्याकडून सहा महिन्यांचे अॅडव्हान्स पेमेंट मागितले होते. त्यावेळी माझ्या बाबांनी पवईतील ऑफिस विकून त्यांची मागणी पूर्ण केली होती. त्यानंतरही कुणालाच फसवायचा बाबांचा हेतू नव्हता. त्यांनी गेली दोन वर्षे लोन देणाऱ्या कंपनीबरोबर मीटिंग्स करून लोन सेटलमेंट करण्यासाठी किंवा रिस्ट्रक्चर करण्यासाठी खूप प्रयत्न केले, जेणेकरून ते कर्ज फेडू शकतील. कंपनीने त्यांना आश्वासनं दिली की आपण सगळं हँडल करू आणि ते कर्ज फेडण्यात त्यांची मदत करतील. पण दुसरीकडे त्यांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. गुंतवणूकदार बाबांची मदत करायला तयार होते. पण कंपनीने त्यांना मदत करू दिली नाही. माझी सगळ्यांना हीच विनंती आहे की बाबांबद्दल कोणत्याही खोट्या बातम्या किंवा चुकीच्या बातम्या पसरवल्या जाऊ नये. माझ्या वडिलांनी खूप मेहनत करून नाव कमावलं होतं, ते मातीत मिसळू नका, असं आवाहन मानसीने केले आहे.