पाकिस्तानच्या ISI एजंटला मेरठमध्ये अटक, मॉस्कोतील हिंदुस्थानी दूतावासात करायचा काम

उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाला (Uttar Pradesh Anti-Terrorism Squad) मोठं यश मिळाले आहे. या पथकाने पाकिस्तानच्या आएसआय (Pakistani Inter-Services Intelligence) एजंटला मेरठमध्ये बेड्या ठोकल्या आहेत. हा एजंट रशियातील मॉस्को (Moscow) शहरात असणाऱ्या हिंदुस्थानी दूतावासामध्ये (Indian Embassy) काम करत होता, असा धक्कादायक खुलासा झाला आहे. सत्येंद्र सिवाल (Satyendra Siwal) असे आयएसआय एजंटचे नाव आहे.

सत्येंद्र सिवाल हा 2021 पासून मॉस्कोतील हिंदुस्थानी दूतावासात कार्यरत होता. तो मूळचा हापूरचा रहिवासी असून परराष्ट्र मंत्रालयामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ म्हणून तो काम करत होता. एका गुप्तहेराद्वारे ही माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने त्याची चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तर दिली. मात्र नंतर त्याने हेरगिरीची कबुली दिली. त्यानंतर त्याला मेरठमधून अटक करण्यात आली.

चौकशीदरम्यान सत्येंद्र सिवाल याने धक्कादायक खुलासे केले. हिंदुस्थानी लष्कर आणि त्यांच्या दैनंदिन कामकाजाची माहिती मिळवण्यासाठी आपण सरकारी अधिकाऱ्यांना पैशांचे आमिष दाखवत होतो, अशी कबुली सत्येंद्र सिवाल याने दिली.

दरम्यान, हिंदुस्थानी दूतावास, संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र व्यवहारांची महत्त्वाची व गोपनीय माहिती आयएसआय हँडलर्सपर्यंत पोहोचवल्याचा सत्येंद्रवर आरोप असून त्याला एटीएसने अटक केली आहे. त्याची कसून चौकशीही सुरू असून आणखीही काही खुलासे होण्याची शक्यता आहे.