‘अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग’, पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देवाची रंगपंचमी मोठ्या उत्साहात व पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. विठूरायावर केशर आणि गुलालाची उधळण केल्यावर “अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग” या अभंगाची प्रचिती आली.

वसंतोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे रंगपंचमी. वसंत पंचमी पासून रंगपंचमी पर्यंत दररोज विठूरायाला पांढऱ्या पोशाखावर गुलाल टाकून पूजा केली जाते. सलग महिनाभर हा दिनक्रम सुरु असतो. या उत्सवाची सांगता रंगपंचमीला होते.

रंगपंचमी दिवशी दुपारी 4.30 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पाद्यपुजा व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या शुभहस्ते सपत्नीक करण्यात आली. देवाच्या अंगावर केशरयुक्त रंग व गुलाल टाकण्यात आला. नंतर डफाची पुजा करुन नामदेव पायरी- तुकाराम भवन – पश्चिम द्वार – चौफाळा – पश्चिम द्वार – व्हीआयपी गेट – नामदेव पायरी अशी मंदिर प्रदक्षिणा करून डफाची सवाद्य मिरवणुक काढण्यात आली.

सदर मिरवणुकीमध्ये रंगाची उधळण करून व मानकऱ्यांना प्रसाद देवून वसंतोत्सवाची सांगता करण्यात आली. या उत्सवाचे सर्व नियोजन विभाग प्रमुख संजय कोकीळ व नित्योपचार विभागातील कर्मचाऱ्यांनी केले होते. यावेळी उत्साहात मंदीर समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.