सांताकुझ-चेंबूर लिंक रोड चार महिन्यांत गेला खड्डय़ात

पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी सरकारने चार महिन्यांपूर्वी बांधलेला सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड अक्षरशः खड्डय़ात गेला आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत असून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 5.9 किमी लांबीच्या रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फेब्रुवारीत झाले आहे.

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे यादरम्यानची वाहतूककोंडी फोडण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड टप्प्या-टप्प्यात बांधण्यात येत आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात 5.9 किमीचा उन्नत मार्ग बांधण्यात येत आहे. यातील पहिल्या टप्प्यातील 1.8 किमी लांबीचा महाराष्ट्र राज्य अग्निशामक इमारत ते रजाक जंक्शनपर्यंत उन्नत मार्ग (अप रॅम्प) आणि महानगर टेलिकॉम निगम लि. (बीकेसी) ते लालबहाद्दूर शास्त्राr पुलाला (कुर्ला) जोडणारा 1.26 किमीचा उन्नत मार्ग (अप रॅम्प) बांधण्यात आले आहेत. या दोन्ही मार्गांची रुंदी 8.5 मीटर असून दोन लेनच्या दोन मार्गिका आहेत. या पहिल्या टप्प्यातील रस्त्याचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते 10 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते, मात्र अवघ्या चार महिन्यांत या मार्गाची दुरवस्था झाली आहे.

असा आहे रस्ता

  • हा मार्ग पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गांना जोडतो
  • प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची एकूण लांबी – 5.90 किमी
  • प्रकल्पाचा एकूण खर्च – 645 कोटी
  • ग्रँट हयात हॉटेल ते रझाक जंक्शन – 1.8 किमी
  • वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स ते कुर्ला – 1.26 किमी

‘एमएमआरडीए’ने अहवाल मागवला
सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरील कपाडिया नगर येथे कुर्ल्यावरून सांताक्रूझच्या दिशेने जाताना मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मोठय़ा प्रमाणात तक्रारी आल्याने ‘एमएमआरडीए’ आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी तत्काळ कामाचा अहवाल मागला असून तातडीने रस्ता दुरुस्ती करण्याचे निर्देश दिल्याचे समजते.

कंत्राटदारावर कारवाई करा
या मार्गाच्या दुरवस्थेमुळे वाहनांचा अपघात होण्याचा मोठा धोका आहे. असे प्रसंग वारंवार घडतही आहेत. याबाबत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पाठपुराव्यानंतर रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू केल्याची माहिती आमदार संजय पोतनीस यांनी दिली. या रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वी होणे आवश्यक होते, मात्र प्रशासनाने कंत्राटदाराला कामासाठी वारंवार मुदतवाढ दिल्याने रस्ता रखडल्याचे ते म्हणाले. अशा बेजबाबदार कंत्राटदारावर कारवाई करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.