प्रागतिक पक्षाची पहिली जन जागरण सभा सोलापुरात; मोदी हटाव, मोदी चले जाव नाऱ्याची एकमुखी घोषणा

आज देश अत्यंत धोकादायक वळणावर असून केंद्रात मोदीप्रणित भाजपाची सत्तेची स्थापन झाल्यापासून देशाच्या विकासाचा आराखडा चढत्या क्रमाने जात असल्याचे खोटे चित्र दाखविण्यात येत आहे. मात्र वास्तविक पाहता महागाई, बेरोजगारी, घरगुती इंधन, पेट्रोल-डिझेल यांची कमालीची दरवाढ झालेली आहे. देशाच्या आर्थिक विकासाचा पाया असणाऱ्या सार्वजनिक उद्योगधंद्यांचे खाजगीकरण करून देशाला अधोगतीकडे नेत आहे.

लोकशाही देश समजल्या जाणाऱ्या हिंदुस्थानात मोदी-शहा, अदानी-अंबानी या चार व्यक्तींच्या भोवती सत्तेची सूत्रे एकवटलेली आहे. प्रत्यक्षात निवडणुकीत 38 टक्के मते मिळवून सत्तेत आलेल्या भाजपविरुद्ध या देशातील 62 टक्के जनता आहे. जनता विरोधी धोरण राबविणाऱ्या मोदी सरकारचा पायउतार करण्यासाठी केंद्रात इंडिया आणि महाराष्ट्रात प्रागतिक पक्ष यांची वज्रमुठ बांधली असून आता आपल्याला एकच नारा पुढे घेऊन जायचे आहे. मोदी हटाव, मोदी चले जाव असा निर्धार सोलापूर येथे झालेल्या पहिल्या जनजागर सभेत ज्येष्ठनेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी केला.

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देण्यासाठी, जनतेच्या जिव्हाळ्याच्या व दैनंदिन गरजेच्या प्रश्नांवर आणि जनता विरोधी धोरण राबणाऱ्या मोदी सरकारच्या विरुद्ध लोकशाही, समाजवादी, प्रजासत्ताक, डावे, मार्क्सवादी, प्रागतिक पक्षाचे मंडळी एकत्र येऊन प्रागतिक पक्षाची स्थापना केली आहे. प्रागतिक पक्षाच्या वतीने जन जागरण सभेच्या माध्यमातून जनतेच्या हिताची भूमिका स्पष्ट करणारी पहिली सभा शनिवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या जनजागरण सभेचे उद्धाटन शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार भाई जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना म्हणाले कि, महाराष्ट्रात किमान समान कार्यक्रम घेऊन प्रागतिक पक्षाची उभारणी झाली असून हि तिसरी आघाडी नाही. महाराष्ट्रातल्या जनतेला लोकशाही आणि कल्याणकारी राज्य देण्याचा निर्धार प्रागतिक पक्षांचा आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त हमीभाव, पीक नुकसानीची योग्य नुकसान भरपाई, शेतमजूर व कामगारांना किमान वेतन व सामाजिक सुरक्षा, राज्यातील महिला, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, व ओबीसी वर होणारे अन्याय व अत्याचार, महागाई व बेरोजगारीचे जटिल प्रश्न, संविधानिक मूल्यांचे रक्षण व त्यासाठी फॅसिझमच्या षडयंत्रास कसून विरोध, या संदर्भातील प्रमुख मागण्यांसाठी राज्य पातळीवर सर्वप्रथम महाराष्ट्र जनजागरण सभा, त्यानंतर तालुका व जिल्हानिहाय जेल भरो आंदोलन आणि त्यानंतर मंत्रालयावर विराट मोर्चा असा आंदोलनात्मक कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. तरी 28 नोव्हेंबर 2023 रोजी मंत्रालयावर शेतकरी-कामगारांचे एकजूट दाखविण्यासाठी लाखोंच्या संख्येन सामील व्हा असे आवाहन जनजागरण सभेच्या उद्घाटनावेळी केले.

सभेच्या सुरुवातीला डावे विचारवंत प्रा. तानाजी ठोंबरे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे या मागणीसाठी लोकशाही मार्गाने शांततेने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर अमानुष्य लाठी हल्ला करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध केले व मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठींबा देणारा ठराव मांडले. यावेळी महाराष्ट्र राज्य सोशलिस्ट रिपब्लिकन पार्टीचे राज्य सचिव श्री धिरज बगाडे, समाजवादी पक्षाचे राज्य महासचिव डॉ रऊफ शेख, स्वमिमानी शेतकरी संघटनेचे मा. विजय रणदिवे, जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्रचे महासचिव साथी प्रताप होगाडे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ सुभाष लांडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर आदींनी सभेला संबोधित केले. यावेळी व्यासपीठावर माकप चे राज्य समिती सदस्य कॉ.युसूफ शेख मेजर, मा. प्रवीण मस्तूद, मा. अबुतालीब डोंगरे, मा. एजाजअहमद अरब, कॉ. सिद्धप्पा कलशेट्टी, कॉ. व्यंकटेश कोंगारी आदि उपस्थित होते. या सभेचे प्रास्ताविक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. एम.एच.शेख तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अॅड. अनिल वासम यांनी केले.