जालना जिल्ह्यातील लाठीमाराचा निषेध; नेवासा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन

जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे मराठा आक्रोश मोर्चावर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने नेवासा फाटा येथे छत्रपती संभाजी नगर ते पुणे महामार्गावर सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यात मराठा समाजासह सर्व जातीधर्माच्या नागरिकांनी उपस्थित राहून मराठा समाजाला आपला पाठिंबा व्यक्त केला.

मराठा मोर्चाचे समन्वयक गणेश निमसे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे, शिवसेनेचे शाखाप्रमुख गणेश झगरे, पी आर जाधव, गणेश चौगुले, बालेन्द्र पोतदार, रावसाहेब घुमरे, सुदाम कापसे, बन्सी सातपुते आदींनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर आपला लढा असाच सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. रास्ता रोको सुरू असताना रुग्णवाहिका आल्याने मराठा बांधवांनी त्वरित रस्ता मोकळा करून दिल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी आभार व्यक्त केले.