रस्त्याच्या श्रेयवादावरून राडा, आमदार अतुल बेनके व माजी आमदार सोनवणे यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले 

जुन्नर तालुक्याचे आजी-माजी आमदार आज पुन्हा एकदा एकमेकांना भिडले. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी बेल्हे-राजुरी या रस्त्याच्या राहिलेल्या कामाचे भूमिपूजन करणारच, अशी घोषणा केली होती; परंतु एकदा झालेल्या रस्त्याचे पुन्हा भूमिपूजन करू देणार नाही, असा इशारा माजी आमदार शरद सोनवणे यांनी दिला होता.

 

बेल्हे येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर रस्ताकामाच्या श्रेयवादावरून वादंग निर्माण झाले. आज सायंकाळी साडेपाच वाजता या घटनेचे तीक्र पडसाद उमटले. आमदार अतुल बेनके, तसेच माजी आमदार शरद सोनवणे यांच्या समर्थकांमध्ये घोषणाबाजी होऊन एकच राडा झाला.

 

आमदार अतुल बेनके म्हणाले, ‘बेल्हे-राजुरीदरम्यान 500 मीटर लांबीच्या रस्त्याचे काम मागील आमदारांच्या अनास्थेमुळे रखडले होते. शिवाय काही गावकऱयांच्या दुकानांची अतिक्रमणे, तसेच काही कारणांमुळे या रस्त्याचे काम थांबविण्यात आले होते. परंतु विद्यमान मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या प्रयत्नांमुळे या रस्त्यासाठी निधी मिळाला व कामाचे भूमिपूजन आज करण्याचे ठरले. मात्र, केवळ राजकारण करीत माजी आमदार शरद सोनवणे यांनी या कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला.’

 

शरद सोनवणे यांनीदेखील हे काम आधीच मंजूर असल्याचे सांगून भूमिपूजन पुन्हा होऊन देणार नाही, असा पवित्रा घेतला. आमदार बेनके यांनी या सर्व गदारोळात गुलाल-भंडारा उधळून व श्रीफळ वाढवून रस्त्याचे भूमिपूजन करून घेतले.

यावेळी जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांनी तालुक्यातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱयांसह पोलीस बंदोबस्त ठेवून कुठलाही अनुचित प्रकार घडून दिला नाही. काही प्रमाणात कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

यावेळी संतप्त ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करीत ‘आमच्या गावाची अब्रू घालवू नका, तुम्ही निघून जा,’ असे बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांना सांगितले. दरम्यान, पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. अजूनही पोलिसांचा बंदोबस्त बेल्हे गावात ठेवण्यात आला आहे, अशी माहिती रवींद्र चौधर यांनी दिली.