गृहमंत्री सावरायला आले अन् शेकून गेले; पोलीस आयुक्तांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न फेल

अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे गाडी चालवून दोघांचा जीव घेतल्यामुळे पुणेकरांसह राज्यभरात प्रचंड संतापाची लाट आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांकडून पहिल्यांदा आरोपीला मदत करण्याच्या भूमिकेमुळे चीड निर्माण झाली. दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हाताबाहेर प्रकरण जात असल्याचे लक्षात येताच, दस्तुरखुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात येऊन पोलिसांना क्लीन चिट दिली. मात्र, याप्रकरणी आता सोशल मीडियासह नागरिकांकडून आणखीनच राग व्यक्त केला जात आहे. त्यामुळे फडणवीस सावरायला आले अन् स्वत: शेकून गेल्याचे बोलले जात आहे.

कल्याणीनगरमध्ये धनाढय़ बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने मद्यपान करून दुचाकीस्वार दोघांना धडक देऊन त्यांचा बळी घेतला आहे. याप्रकरणात पुणे पोलीस, आमदार, बाल हक्क बोर्ड, आरोपीला पिझ्झा-बर्गरची पार्टी, नागरिकांच्या रेटय़ामुळे पोलिसांनी कलमात केलेल्या बदलामुळे अपघात प्रकरण पूर्णत: ढवळून निघाले होते. अपघात प्रकरणाची व्याप्ती पोलिसांवर शेकत असल्याचे लक्षात येताच, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानकपणे पुण्यात धाव घेतली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हाताबाहेर गेलेल्या प्रकरणावर पांघरूण घालण्यासाठी फडणवीसांनी अधिकाऱयांसोबत बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत गुळमुळीत उत्तरे देत वेळ मारून नेली. आरोपीविरुद्ध पोलिसांनी 304 कलम नोंदविला आहे, असा दावा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला. मात्र, 19 मे रोजी 8 वाजून 13 मिनिटांनी पुणे पोलिसांनी 304 अ कलम लावल्याचा एफआयआर पत्रकारांनी गृहमंत्र्यांना दाखविला. त्यावर खुलासा करताना मात्र फडणवीसांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न सपशेल फेल ठरला.

तेव्हा फडणवीस कुठे होते?

पुण्यातील कोथरूड परिसरात बीट मार्शलांनी दोन दहशतवाद्यांना पकडले होते. त्यानंतर दहशतवाद्यांचे देशभरातील नेक्सस उघडकीस आले होते. पुणे पोलिसांच्या कारवाईमुळे दहशतवाद्यांची साखळी तोडण्यास मदत झाली होती. मात्र, त्या वेळेसचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात येऊन पोलिसांचे काwतुक का केले नाही. असाही प्रश्न निर्माण झाला आहे. अंगलट आलेल्या अपघात प्रकरणात सोयीच्या भूमिका घेत अधिकाऱयांना पाठीशी घालण्याचे काम आता कोण करीत आहे?