पुण्यातील हिट ऍण्ड रन प्रकरण – आमदाराच्या हस्तक्षेपामुळे रक्तचाचणीला उशीर; आरोपीला फायदा होण्याची शक्यता

भरधाव आलिशान मोटार चालवीत दोघांचा जीव घेणाऱया अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) आमदाराने रविवारी पहाटेच्या सुमारास येरवडा पोलीस ठाण्यात जाऊन सेटिंग केली. त्यामुळे पोलिसांवर दबाव आल्यामुळे अल्पवयीनाला वेळेत ससून रुग्णालयात दाखल करता आले नाही.  परिणामी अल्पवयीनाने दारू प्यायली आहे की नाही, यासाठीच्या रक्त चाचणीला उशीर झाला. त्यामुळे आरोपीला फायदा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कल्याणीनगरमध्ये बिल्डर विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलाने शनिवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हॉटेलसह पबमध्ये मित्रांसमवेत दारू प्यायली. त्यानंतर त्याने पहाटे साडेतीनच्या सुमारास कल्याणीनगरमध्ये भरधाव मोटार चालवून दोघांचा जीव घेतला. याप्रकरणी पोलिसांनी काही तासांनी अल्पवयीन चालकाला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर आमदार सुनील टिंगरे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन अल्पवयीन मुलाविरुद्ध कारवाई न आणण्यासाठी दबाव आणला. आमदाराच्या दबावामुळे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला वेळेत ससून रुग्णालयात दाखल केले नाही. त्यामुळे रक्ताचे नमुने घेण्यास उशीर झाला. दरम्यान, गुन्हा दाखल करण्यासही पोलिसांनी विलंब केला. मात्र, अपघाताचे व्हायरल झालेले व्हिडीओ, नागरिकांचा संतापामुळे पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला. तोपर्यंत रविवारची दुपार ओलांडली होती. त्यामुळे आरोपीला रक्तसंकलन चाचणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यास पोलिसांनी जाणूनबुजून उशीर केला. याप्रकरणी आमदार टिंगरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचितचे  शहराध्यक्ष मुनक्वर कुरेशी यांनी  केली आहे.