पोलीस आयुक्त बिल्डरच्या पैशांवर काम करतायेत, तातडीने बदली करा – आमदार रवींद्र धंगेकर

कल्याणीनगर अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका होऊनही शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना अजूनही कोणी दोषी आहेत असे वाटत नाही. ते स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतायेत, त्यामुळे ते कुणावर कारवाई करणार नाहीत. याप्रकरणी पोलीस आयुक्तांची तातडीने बदली करून अपघाताची त्रयस्त यंत्रणेमार्फत अथवा निवृत्त न्यायाधिशामार्फत चौकशी करावी, अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्राद्वारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

अल्पवयीन आरोपी मुलाला वाचवण्यासाठी येरवडा पोलीस ठाण्यामध्ये करोडो रुपयांचा व्यवहार झाला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अपघात प्रकरण फारसे गांभीर्याने घेतले नाही. ते दोषी अधिकार्‍यांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे त्यांची तातडीने बदली करावी. बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालच्या व्यावसायिक कामातही अनियमितता आहे. नियमावलीला फाटा देऊन त्यांनी कामे केली आहेत. अग्रवाल यांचे अंडरवर्ल्डचे संबंध आहेत. याबाबतचा तपास थांबलेला आहे. सर्व घटनेची गृह खात्याने कसून चौकशी करावी. दरम्यान, ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणातील महत्त्वाची भूमिका असलेल्या संजीव ठाकूर याला वेळकाढूपणा करुन पोलिस आणि शासनाने वाचवले. तोच प्रकार या प्रकरणात होउ नये. दोषींवर योग्य ती कारवाईची मागणी धंगेकर यांनी केली आहे.

पुण्यात रात्री दीडपर्यंत पब सुरू ठेवण्याची परवानगी आहे. पण, प्रत्यक्षात ते पब पहाटेपर्यंत बेकायदेशीरपणे सुरू ठेवले जात आहेत. त्याचा स्थानिकांना प्रचंड मानसिक त्रास होत आहे. तरुण पिढीला वाचवण्यासाठी पब संस्कृती मुळापासून उखडून टाकण्याचे धाडसी पाऊल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उचलावे.

पब संस्कृतीमुळेच कल्याणीनगर भागात अपघात घडला. प्रकरणातील दोषी असलेल्या अल्पवयीन आरोपी मुलाला वाचवण्यासाठी यंत्रणेने वेगाने काम केले आहे. पोलिसांनी गुन्ह्यात जी कलमे लावणे आवश्यक होती, ती लावली नाहीत. उलट आरोपीला लवकर सोडविण्यासाठी रेड कार्पेट अंथरले होते. त्यामुळे संशयाची सुई तपास अधिकार्‍याकडे जाते. त्यामुळे त्यालाही निलंबन केले पाहिजे.

मुंढवा पोलीस ठाण्याचे तीन कर्मचारी हप्तेबाज

मुंढवा पोलीस ठाणे अवघे तीन कर्मचारी चालवतात. त्यापैकी निलेश पालवे, काळे हे सर्व पब्स ,हॉटेलमधून हप्ते गोळा करण्याचे काम करतात. हे वसुली कॉन्स्टेबल वॉटर्स पबमध्ये पार्टी करताना दिसून येतात. पुणे बिघडविणार्‍या संबंधित पोलीस कॉन्स्टेबलांची तातडीने चौकशी करून त्यांना निलंबित करा, अन्यथा 48 तासात त्यांचे इतर व्हिडिओही ट्विट करण्यात येतील, असेही आमदार रवींद्र धंगेकर यांनी एक्सवर मांडलेल्या पोस्टद्वारे नमूद केले आहे.