कवठे येथील श्री येमाई देवी, महाराष्ट्रातील तमाम भाविक भक्तांचे श्रद्धास्थान

>> सुभाष शेटे

उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील ग्रामदैवत,कुलदेवी व संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम भाविक भक्तांचे श्रद्धास्थान,आराध्य दैवत,कुलदैवत असणा-या श्री येमाई देवीचा नवरात्र महोत्सव सुरु होत आहे. तालुक्यातील शिरुर-मंचर रोडवर कवठे गावच्या दक्षिणेस 3 कि. मी. वर असणारे प्रसिद्ध तिर्थक्षेत्र श्री येमाई देवी देवस्थान एक जागृत देवस्थान असुन,या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येणा-या भाविक भक्तांची मनोकामना,मनातली इच्छा पुर्ण होत असल्याने भक्त गणांची येथे नवस फेडण्यासाठी नेहमीच गर्दी होत असते.चैत्र पौर्णिमेस होणारी देवीची यात्रा व नवरात्र उत्सवात तर 10 दिवस या ठिकाणी मोठी गर्दी होतअसते.नवरात्र उत्सव काळात दैनंदिन पूजाविधी,आरती वेळेत व उत्साहात करण्यात येते.

कवठे येमाई गावास ऐतिहासिक वारसा लाभलेला असून गावाजवळून वाहणा-या घोडनदीच्या किनारी पुर्वी हे गाव वसलेले होते अशी आख्यायिका आहे.कवठे येमाई गावचे वैभव असलेल्या श्री यमाई देवीच्या प्राचीन मंदीराचा जिर्णोद्धार करण्यात आला असुन मंदीर परीसरास तिर्थ क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. मंदीर परीसरात सभोवताली असलेले मोठ-मोठे वट वृक्ष,मंदीराच्या उत्तरेस पाय-या असलेली ऐतिहासिक बारव (विहीर),मंदीरातील प्रशस्त गाभारा,समोरच मोठा सभामंडप,देवालयाच्या सभोवताली मोठ्या तटबंदीचा वाडा,त्यास पुर्वेकडून व उत्तरेकडून असणारी भव्य प्रवेश द्वारे,मंदीरा समोरच दोन मोठ्या घाट्या असुन पुर्वेकडील दरवाज्या जवळ दोन मोठे नगारे आहेत.मंदीराच्या आवारात ३ ऊंच दिपमाळी असुन नवरात्र उत्सव व चैत्र पोर्णिमेस होणा-या यात्रा उत्सवात त्या पेटविल्या जातात.देवीच्या मंदीराच्या मागील बाजुस 15 फुट खोल दगडी बांधकामातील श्री महादेवाचे ऐतिहासिक मंदीर असुन दगडी पिंड व दगडी नंदी हे या मंदीरचे वैषिष्ठ्य आहे.याच महादेवाच्या मंदिरातून 3 की.मी.अंतरावर असणा-या कवठे गावात असलेल्या राजवाड्या पर्यंत पुर्वी भुयारी मार्ग होता.

धार-इंदूर,वणी ते दिंडोरीच्या पायथ्यापासुन तसेच पुणे,मुंबई,नगर,नाशिक,जळगाव सह संपूर्ण महाराष्ट्रातुन देवीचे भक्त दर मंगळवारी,शुक्रवारी,नवरात्र उत्सव व चैत्र पौर्णिमेस होणाऱ्या यात्रा उत्सवात श्री येमाई देवीच्या दर्शना साठी येत असतात.देवीची पुजा गोरे पाटील करीत आहेत.दररोज सकाळी 8 व संध्याकाळी 6 वाजता नियमित देवीची आरती व ओलांडा या ठिकाणी होत असतो.विषेशेकरुन भाविकांची या वेळेस मोठी गर्दी होत असते. दर पौर्णिमेला रात्री व आषाढ,श्रावण महिन्यातील मंगळवारी सायंकाळी गावातुन श्री येमाई देवीच्या पालखीची सवाद्य मिरवणूक निघते.नवरात्रात देवीचा मोठा उत्सव साजरा केला जातो.होम-हवन व इतर धार्मिक कार्यक‘म मोठ्या श्रद्धेने साजरे करण्यात येतात.यावर्षी ही सर्व धार्मिक विधी परंपरेने साजरे होणार आहेत. वार्षीक पिकपाण्याचा अंदाज घेण्यासाठी जेष्ठ महीन्यातील पौर्णिमेस सायंकाळी मंदीरासमोर असणारी सुमारे 125 किलोग्रॅम वजनाची मोठी दगडी गोटी 13 जणांच्या उजव्या हाताच्या मधल्या एकच बोटांच्या सहाय्याने उचलली जाते.हा मान पिढ्यानपिढ्या मुंजाळवाडी ग्रामस्थांना आहे. येथील श्री येमाई देवी मंदीराला तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला असल्याने लवकरच मंदीर परीसराचा कायापालट होणार ही अपेक्षा ग्रामस्थ व भाविक करीत आहेत.

कवठे येमाई ता.शिरुर येथील तीर्थक्षेत्र श्री यमाई देवी मंदीर हे पुण्यापासुन 70 कि.मी.,शिरुर पासुन 27 कि.मी.,मंचर पासुन 35 कि.मी.तर राजगुरुनगर पासुन 45 कि.मी.व कवठे येमाई गावापासुन 3 कि.मी.अंतरावर हे मंदिर आहे.उत्सव काळात येमाई मंदिरास भेट देणाऱ्या भाविकांची वाहनांची संख्या लक्षात घेता हा 3 किमी लांबीचा रस्ता दुपदरी व्हावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.