इलेक्ट्रोल बाँड्स हा देशातील सर्वात मोठा घोटाळा, राहुल गांधी यांची टीका

इलेक्ट्रोल बाँड्सचा तपशील देण्यासाठी स्टेट बँकेने 30 जून पर्यंत सादर करण्याची मुदत मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाने बँकेला 24 तासात या बाँड्सचा तपशील सादर करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारसाठी देखील हा मोठा धक्का आहे. यावरून काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर टीका करत इलेक्ट्रोल बाँड्स हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला आहे.

इलेक्ट्रोल बाँड्सचा तपशील उघड झाल्यानंतर नरेंद्र यांचा खरा चेहरा देशासमोर येईल अशी टीका देखील त्यांनी केली आहे. ”नरेंद्र मोदी यांचा देणग्यांच्या धंद्याची पोलखोल होणार आहे. 100 दिवसात स्विस बँकेतून काळे धन आणण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेले हे सरकार स्वत:चा बँकेतील डेटा लपवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका करतेय. इलेक्ट्रोल बाँड हा देशातील सर्वात मोठा घोटाळा ठरणार आहे. जो भ्रष्ट उद्योगपती आणि सरकारशी संबंधित व्यक्तींची पोलखोल करून नरेंद्र मोदींचा खरा चेहरा देशासमोर आणेल. क्रोनोलॉजी स्पष्ट आहे. देणगी द्या – धंदा घ्या, देणगी द्या – संरक्षण घ्या.देणगी देणाऱ्यांवर कृपा आणि सामान्य जनतेवर टॅक्सचा मार. हेच आहे भाजपचे मोदी सरकार’, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.