2024 मध्ये ‘इंडिया’ भाजपला देणार सरप्राईज; पाच राज्यांमध्येही पानिपत होणार! राहुल गांधी यांचा ठाम विश्वास

पुढील वर्षी होणाऱया लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडी भाजपला मोठे सरप्राईज देणार असून पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपचे पानिपत होईल. मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये काँग्रेसच बाजी मारेल, तेलंगणाही जिंकेल तर राजस्थानात अतिशय अटीतटीची लढाई होईल, मात्र इथेही काँग्रेसच आघाडीवर राहील, असा विश्वास काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केला. आज दिल्लीत एका मीडिया हाऊसच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

महत्त्वाच्या मुद्दय़ांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजप नवनवीन क्लृप्त्यांचा वापर करत आहे. रमेश बिधुडी यांनी संसद अधिवेशनादरम्यान खासदार दानीश अली यांना शिवीगाळ करणे आणि ‘एक देश एक निवडणूक’ आणि भारत किंवा इंडिया असा वाद निर्माण करणे हे त्यापैकीच एक असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला. संसदेत जेव्हा एखादा महत्त्वाचा विषय आणला जातो तेव्हा जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी अशा गोष्टींचा वापर सत्ताधाऱयांकडून केला जातो; परंतु अशा गोष्टींशी दोन हात कसे करायचे हे आम्ही शिकलो आहोत, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

भाजपा मीडियावर विळखा घालून बसलीय
भाजपा मीडियावर विळखा घालून बसलीय. हे नियंत्रण इतके आहे की लोकांसोबत प्रत्यक्षात संवाद साधणे अशक्य झाले आहे. भाजपने कितीही ताकद लावली आणि प्रसारमाध्यमांनी गोष्टी कितीही वाढवून सांगितल्या तरी याचा भाजपला कुठल्याच प्रकारे फायदा झालेला नाही. ही समस्या केवळ हिंदुस्थानातच नाही तर संपूर्ण जग या समस्येशी तोंड देत असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

अदानी प्रकरणाला बगल देण्यासाठी अधिवेशन
अदानी प्रकरणाला बगल देण्यासाठी आणि जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलावल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. मोदी सरकार ‘इंडिया’चे भारत असे नामकरण करू पाहत आहे; परंतु हे जनतेला आवडणार नाही याचा त्यांना प्रत्यय आलाय. त्यामुळेच मग विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याकडे राहुल गांधी यांनी लक्ष वेधले.

कर्नाटक निवडणुकीतून धडा शिकलो
कर्नाटक निवडणुकीतून आम्ही मोठा धडा शिकलो. भाजप महत्त्वाच्या मुद्दय़ांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवते हे निदर्शनास आले. अशाच प्रकारे भाजप अनेक निवडणुका जिंकत आले आहे. त्यामुळे यावेळी आम्ही सावध पवित्रा घेतला असून येथील जनतेला एक दृष्टिकोन दिल्याचे राहुल गांधी म्हणाले. तेलंगणात ‘इंडिया’ आघाडी जिंकू शकते. कारण तिथे भाजप पूर्णपणे संपली असून मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानात अटीतटीची लढत होऊ शकते. भाजपच्या गोटातही अशीच चर्चा सुरू असल्याचा दावाही राहुल गांधी यांनी केला.

बेरोजगारी, आदिवासी, महागाई हेच प्रमुख मुद्दे
देशात गरीबी, बेरोजगारी, आदिवासी, ओबीसी आणि महागाई हेच प्रमुख मुद्दे असून या मुद्दय़ांवर भाजप लढू शकत नाही. त्यामुळेच रमेश बिधुडीसारखे लोक शिवीगाळ करतात, ‘एक देश एक निवडणूक’ आणले जाते. ‘इंडिया’चे भारत करण्याचा प्रयत्न होतो. पण भाजपच्या या सर्व क्लृप्त्या सर्वांना कळल्या आहेत. आता हे चालणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

60 टक्के जनता ‘इंडिया’सोबत
हिंदुस्थानातील तब्बल 60 टक्के जनता ‘इंडिया’सोबत आहे. भाजप प्रसारमाध्यमांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा स्थितीतही विरोधी पक्ष भाजपला सरप्राईज देण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी करत असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.