जातिनिहाय जनगणना करायला मोदी का घाबरतात? राहुल गांधी यांचा थेट सवाल

आपण जर इतर मागासवर्गीय समाजाला (ओबीसी) त्यांचा वाटा देण्यासंदर्भात बोलत असू तर जातिनिहाय जनगणनेशिवाय ते शक्य नाही. पंतप्रधान मोदी 24 तास ओबीसी समाजाबद्दल बोलतात, ओबीसींचा आदर करतो असे म्हणतात, मग जातिनिहाय जनगणना करायला पंतप्रधान का घाबरतात? असा थेट सवाल करीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला.

जयपूर येथे आयोजित काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता संमेलनात राहुल गांधी बोलत होते. काँग्रेस पक्षाने जातिनिहाय जनगणना केली होती. याची आकडेवारी केंद्र सरकारकडे आहे. पंतप्रधानांनी ही आकडेवारी देशातील जनतेसमोर ठेवली पाहिजे. तसेच, मोदी सरकारनेही जातिनिहाय जनगणना केली पाहिजे. ओबीसींचा अपमान करू नका, ओबीसींना धोका देऊ नका, असा घणाघातही राहुल गांधी यांनी केले. पंतप्रधान 24 तास ओबीसी समाजाबद्दल बोलतात. ओबीसी समाजाचा आदर करतो असे सांगत असतात. मग मोदी जातिनिहाय जनगणना करायला का घाबरतात? असा सवाल करतानाच राहुल गांधी यांनी जातिनिहाय जनगणना केल्याशिवाय ओबीसी समाजाला न्याय मिळणार नाही असे सांगितले.

महिलांना आरक्षण आजच दिले जाऊ शकते; पण सरकार टाळाटाळ करतेय
महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी नवीन जनगणना आणि मतदारसंघ पुर्नरचना करण्याची गरज नाही. आजच महिलांना आरक्षण दिले जाऊ शकते. परंतु मोदी सरकार कारणे शोधत आहे. टाळाटाळ करत आहे, असे राहुल गांधी यांनी सुनावले.
लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण दहा वर्षांनंतर द्यावे असे भाजपला वाटते. परंतु आमची मागणी आहे आजपासूनच लागू करा. ओबीसी महिलांनाही आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे.
देशात सध्या भाजप आणि काँग्रेस पक्ष यांच्या विचारधारेची लढाई सुरू आहे. जर भाजप कार्यकर्त्यांना मोदी आणि अदानी यांच्यासंबंधी काही विचारले तर ते पळून जातील, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.