रामलल्ला दुपारी तासभर घेणार विश्रांती

रामलल्लाचे दर्शन दुपारी 12 ते 1 दरम्यान बंद राहणार आहे. तसेच दिवसातून तीन वेळा होणाऱ्या आरतीमध्ये केवळ 100 भाविकांना सहभागी होता येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पासची यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. रोज दुपारी 12 वाजता भोग आणि आरती झाल्यानंतर रामलल्लाच्या विश्रांतीसाठी दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत दर्शन पूर्णपणे बंद राहणार असल्याचे मंदीर प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भाविकांची गर्दी पाहता दुपारी केवळ 15 मिनिटांसाठी मंदीर बंद ठेवण्यात आले होते. मात्र आता रोज दुपारी एक तास दर्शन बंद असेल अशी माहिती राम मंदीर ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी दिली. सकाळी साडेसहा ते दुपारी 12 आणि नंतर दुपारी 1 ते रात्री 9.30 या वेळेत भाविकांना दर्शन घेता येईल, असेही त्यांनी सांगितले.