डॉक्टरांना सॅल्यूट! जखमी जवानाचा तुटलेला हात चार तासांनंतर जोडला

लडाखमध्ये हिंदुस्थानी लष्करातील एका जवानाचा मशीन चालवताना हात तुटला. ही घटना घडल्यानंतर हिंदुस्थानी वायू दलाने विमान सी-130 ने रात्री दिल्लीतील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. लष्कराच्या रिसर्च रेफरल (आर अँड आर) हॉस्पिटलमध्ये जवानाला शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करत तुटलेला हात पुन्हा जोडला. ही घटना बुधवारी घडली. जखमी जवानाला आधी लेह विमानतळावर आणले. तेथून सुपर हरक्यूलिस विमानाने दिल्लीतील पालम वायू सैन्याच्या स्टेशनवर पोहोचवले. लेह हवाई अड्डयांवरून दिल्लीला आणण्यासाठी जवळपास चार तास लागले. परंतु, तरीही डॉक्टरांनी यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून तुटलेला हात पुन्हा एकदा जोडला. हिंदुस्थानी लष्कराने शुक्रवारी सकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करून यासंबंधीची माहिती दिली. डॉक्टरांचे आभार मानताना हॉस्पिटलमध्ये रुग्ण आणि डॉक्टरांचा एक पह्टो सुद्धा शेअर केला आहे. हिंदुस्थानी सैन्याच्या अधिकाऱयांनी सांगितले की, हिंदुस्थानी वायू सैन्याने एप्रिल 2023 मध्ये संघर्षग्रस्त सुदानहून लोकांना आणण्यासाठी एक मोहीम राबविली होती. त्यावेळी सी-130 जे विमानाचा वापर करण्यात आला होता. पायलट सोबतच्या सदस्यांनी दाट अंधारामुळे नाईट व्हिजन चष्म्याचा वापर केला होता. तो यावेळीही करण्यात आल्याचे लष्करच्या अधिकाऱयांनी म्हटले.